जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे फळ बाजारामध्ये घ्यायला जातो तेव्हा ते फळ नैसर्गिकरित्या पिकलेले असेल याची शक्यता खूप कमी असते. कारण आता बरीच फळे ही रसायनांचा वापर करून किंवा रासायनिक पद्धतीने पिकवली जातात. अशा पद्धतीने पिकवलेली फळे खाल्ल्याने आरोग्यावर काही विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
त्यामुळे कोणतेही फळ घेताना ते काळजीपूर्वक पाहून खरेदी करणे खूप गरजेचे असते. सध्या आंब्याचा सिझन सुरू असून या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आंब्याची खरेदी केली जाते व आवडीने आंबे खाल्ले जातात. परंतु जेव्हाही आपण बाजारामध्ये आंबे घ्यायला जातो तेव्हा ते नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले असतील याची कुठल्याही प्रकारची शाश्वती आपल्याला नसते.
कारण बऱ्याचदा रासायनिक पद्धतीने पिकवलेलेच आंबे विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्हाला जर नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने ते पिकवू शकतात.
बाजारातून कच्च्या कैऱ्या विकत घेऊन नैसर्गिक पद्धतीने घरी पिकवा आंबे
तुम्हाला जर नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवायचा असेल तर त्याकरिता बाजारातून कैऱ्या विकत घेऊन घरी पिकवणे खूप गरजेचे आहे व त्याकरिता वेगवेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. यामधील प्रमुख पद्धत पाहिली तर तुम्हाला जर नैसर्गिक पद्धतीने घरी आंबा पिकवायचा असेल तर अगोदर जमिनीवर भाताचा पेंडा, गव्हाचा काड किंवा वाळलेले गवत इत्यादी पैकी जे मिळेल ते घ्यावे व त्याचा जमिनीवर साधारणपणे चार ते पाच इंच जाडीचा थर तयार होईल अशा रीतीने पसरून घ्यावे.
यामध्ये जमीन जर खाली शेणाने सारवलेले असेल तर खूप मोठा फायदा मिळतो. त्यानंतर गवताच्या थरावर बारदाना किंवा पोते अंथरावे. या पोत्यावर सर्व आंब्यांचे देठ एकाच दिशेला येतील अशा पद्धतीने एका रांगेमध्ये ठेवून घ्यावेत. दोन आंब्यांचे देठ एकमेकांसमोर येणार नाहीत याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे व त्या पद्धतीनेच आंबे ठेवावे.
आपण पाहिले असेल की आंबा खराब व्हायला सुरुवात ही प्रामुख्याने देठाकडून होते. कारण जेव्हा कोणतेही फळ पिकते तेव्हा त्यातून इथिलिन हा वायू बाहेर पडत असतो व हा देठाजवळून जास्त बाहेर पडतो. त्यामुळे आंबा खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे देठ एका दिशेलाच ठेवावे.
तसेच आंब्याच्या रचलेल्या खालच्या थरामध्ये जी काही रिकामी जागा म्हणजेच सापटी असते त्यामध्ये वरचा थर लावायचा असतो. परत बारदाना पोते टाकून दुसऱ्या थरामध्ये राहिलेल्या सापटीमध्ये तिसरा थर लावायचा अशा पद्धतीने जास्तीत जास्त तीन थर आपण या पद्धतीत लावू शकतो.
क्रेटमध्ये कसा पिकवाल आंबा?
तुम्हाला जर क्रेटमध्ये आंबे पिकवायचे असतील तर त्याकरिता क्रेटच्या चारही बाजूला तसेच खालच्या बाजूने गव्हाचे काड किंवा भाताचा पेंडा लावून त्याला पेपरने कव्हर करून घ्यावे. त्यानंतर क्रेटमध्ये आंबे लावताना ग्रेडनुसार लावणे गरजेचे आहे. क्रेटमध्ये आंबे भरताना सगळ्यात खाली एक थर लावल्यानंतर त्यावर पुन्हा पेपर, गवत, पेपर टाकून एकावर एक थर लावून घ्यायचे आहेत.
एका क्रेटमध्ये तीन थर चांगले बसतात. क्रेटमध्ये सगळ्यात वर पेपर लावून त्यावर पोते टाकून क्रेट व्यवस्थित झाकून घ्यावे.अशा पद्धतीने जर आंबे पिकवले तर चार ते पाच दिवसात आंब्यांना चांगला रंग मिळतो व ते नैसर्गिक पद्धतीने पिकतात. यामध्ये हवेचा दमटपणा किती आहे
किंवा कोणत्या स्टेजला आंबे काढले आहेत यावर देखील पिकण्याचा कालावधी कमी जास्त होऊ शकतो. याव्यतिरिक्त तुम्हाला जर घरी खाण्यापुरते एक ते दोन डझन आंबे पिकवायचे असतील तर ते एखाद्या कॉटनचे कापड किंवा पोत्यामध्ये ठेवून देखील पिकवू शकतात.
वरील नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्याची पद्धत ही शेती अभ्यासक पल्लवी चिंचवडे यांनी सांगितली आहे.