उन्हाळ्याच्या कालावधी हा अगदी नकोसा असलेला कालावधी असतो. या कालावधीमध्ये घामाने रापलेले शरीर आणि सगळीकडे जाणवणारा प्रचंड उकाडा आपल्याला त्रस्त करून ठेवतो. अक्षरशः आपल्यावर नको हा उन्हाळा म्हणण्याची वेळ येते. परंतु या उन्हाळ्यातमध्ये जमेची बाब म्हणजे या कालावधीत प्रत्येकजण वेगवेगळ्या फळांचे थंडगार ज्यूस, लस्सी, ताक इत्यादी थंडगार पेयांचा आस्वाद घेत असतो.
त्यातल्या त्यात मात्र कलिंगड आणि आंबा ही सगळ्यांना आवडणारी फळे देखील या कालावधीतच आपल्या भेटीला येतात. त्यातल्या त्यात आता फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याचे आगमन सुरू झाले असून आता गुढीपाडव्यानंतर प्रत्येक घरामध्ये आमरसाचा बेत केला जातो व ही खवय्यांसाठी एक वेगळीच पर्वणी असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आंब्याची देखील खरेदी या कालावधीत केली जाते.
परंतु जेव्हा आपण आंबा खरेदी करायला जातो तेव्हा आपण आंबा गोड आहे की नाही हे पाहूनच खरेदी करतो. परंतु यामध्ये बऱ्याचदा आपण आंबे खरेदी करतो मात्र ते गोड निघत नाही किंवा आंबे गोड निघाले तर काही कालावधीने आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो. याच्या मागील प्रमुख कारण म्हणजे ज्याप्रमाणे अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते
अगदी त्याच पद्धतीने फळांच्या हंगामामध्ये देखील कृत्रिम रसायने व पावडरीचा वापर करून फळे पिकवली जातात व अशाच प्रकारे आंबे देखील पिकवले जाण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आंबे खरेदी करताना अशा प्रकारचा आंबा खरेदी केला जाऊ नये याकरिता भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अर्थात एफएसएसएआयने महत्वपूर्ण माहिती दिली असून त्याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
काय म्हणते याबद्दल एफएसएसएआय?
भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने याबद्दल महत्त्वाची माहिती दिली असून त्यानुसार पाहिले तर जागतिक पातळीवर देखील कृत्रिमरित्या पिकवलेली फळे हे मानवी आरोग्यासाठी किंवा वापराकरिता असुरक्षित मानली जातात. यामध्ये आंबा या फळाला पिकवण्याकरिता जे घटक वापरले जातात ते शरीर किती सहन करू शकते व किती शरीराला ते सुरक्षित आहेत किंवा असुरक्षित आहेत हे देखील पाहणे गरजेचे आहे.
त्यामध्ये कॅल्शियम कार्बाइड मोठ्या प्रमाणावर आंब्यांना पिकवण्यासाठी वापरले जाते. परंतु या कॅल्शियम कार्बाइडला भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या प्रतिबंध आणि विक्री नियमन, 2011 च्या नियमांतर्गत कठोरपणे प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. याव्यतिरिक्त कृत्रिमरित्या आंबे पिकवण्याच्या प्रक्रियेदरम्यान ऍसिटिलीन वायूचा वापर देखील केला जातो. परंतु यामधील कॅल्शियम कार्बाईड हे त्याला हँडल करणारे म्हणजेच हाताळणारे व ग्राहकांसाठी देखील धोक्याचे ठरते.
आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे हे कसे ओळखावे?
1- याकरिता आंबे खरेदी केल्यानंतर ते एका बादली पाण्यामध्ये टाकावेत.
2- जेव्हा तुम्ही या बादलीभर पाण्यामध्ये आंबे टाकाल व ते आंबे जर पाण्यामध्ये बुडाले तर ते नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत असे समजावे.
3- परंतु आंबे बादलीभर पाण्यात टाकल्यानंतर जर ते बुडाले नाहीत व वरती तरंगत असतील तर आंबे कृत्रिमरित्या पिकवले आहेत असे समजावे.
नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंबे ओळखण्याच्या तज्ञांनी सांगितलेल्या पद्धती
याबद्दल काही तज्ञ म्हणतात की आंब्याच्या देठा भोवती वास घेतल्यावर जर त्याचा गोड सुगंध जाणवला तर तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे असे समजावे. एवढेच नाही तर रासायनिक पद्धतीने जर आंबा पिकवला असेल तर त्याच्या पृष्ठभागावर पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे डाग दिसून येतात. याउलट नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्यामध्ये हिरवी आणि पिवळे डागांचे एकसमान मिश्रण दिसून येते.
तसेच कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा असेल तर त्यातून निघणारा रस खूपच कमी असतो. परंतु नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या आंब्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रस निघतो. सगळ्यात ओळखण्याची सोपी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही आंबा अर्धा कापता व त्यानंतर त्या कापलेल्या आंब्याच्या साली जवळील गराचा रंग जर आतील घरापेक्षा वेगळा असेल तर तो आंबा कृत्रिमता पिकवलेला आहे असे समजावे. याउलट जर नैसर्गिकरीत्या पिकवलेला आंबा असेल तर कापल्यानंतर देखील गराचा रंग सगळीकडे पिवळा व एकसमान दिसतो.