आज खाद्यपदार्थांमधील भेसळ एक गंभीर समस्या असून अशा प्रकारचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर अनेक प्रकारचा विपरीत परिणाम होऊ शकतो. खाद्य पदार्थांमध्ये प्रामुख्याने दुधापासून तर अनेक दुग्धजन्य पदार्थ तसेच तूप यासारख्या महत्त्वाच्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळीचे प्रमाण वाढताना सध्या दिसून येत आहे.
यामध्ये जर आपण तूप पाहिले तर याचा मोठ्या प्रमाणावर आहारात वापर केला जातो व ते आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे देखील आहे. साधारणपणे ग्रामीण भागात ज्यांच्या घरी गाई किंवा म्हशी असतात अशा शेतकऱ्यांच्या घरी तूप घरीच बनवले जाते. परंतु काही वेळा ते बाहेरून विकत आणावे लागते. ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा गावरान तूप म्हणजेच देशी तूप विकणारे अनेक जण आपल्याला फिरताना दिसतात.
फेरीवाल्यांकडून देखील आपण बऱ्याचदा तूप विकत घेतो. परंतु खरंच हे तूप शुद्ध असते की भेसळयुक्त हे मात्र आपल्याला कळत नाही. याकरिता आपण काही छोटेसे ट्रिप्स बघणार आहोत ज्याची मदत घेऊन तुम्ही शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तूप ओळखू शकतात.
या ट्रिक्स वापरा आणि भेसळयुक्त तूप ओळखा
1- पाण्याचा वापर करून– पाण्याचा वापर करून तुम्ही तुपाची शुद्धता ओळखू शकता. याकरिता फक्त तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यावे लागेल व त्यामध्ये एक चमचा तूप टाकावे लागेल. जर पाण्यात टाकलेले तूप वर तरंगत असेल तर ते शुद्ध तूप आहे असे समजावे. परंतु पाण्यात टाकलेले तूप ग्लासच्या तळाशी साचले तर समजायचे त्या तुपामध्ये भेसळ आहे.
2- आयोडीन टेस्टचा वापर– आयोडीनचा वापर करून तुम्हाला तुपाची शुद्धता तपासायची असेल तर याकरिता एका वाटीमध्ये तूप घ्यावे व त्यामध्ये आयोडीनचे काही ड्रॉप मिसळून घ्यावेत. आयोडीन मिसळलेले हे मिश्रण एकूण 20 मिनिटांकरिता तसेच ठेवून द्यावे. वीस मिनिटानंतर जर तुपाला लाल किंवा निळा रंग आला तर ते तूप भेसळयुक्त आहे असे समजावे. जर तुपाचा रंग बदलला नाही तर ते तूप शुद्ध आहे असे समजावे.
3- तूप हातावर घासणे– या पद्धतीमध्ये तुम्ही हातावर तूप घासून देखील तुपाची शुद्धता ओळखू शकतात. याकरिता तुम्हाला हातावर तूप घासावे लागेल व तूप हातावर घासल्यानंतर लगेच विरघळत असेल तर ते तूप शुद्ध आहे असे समजावे आणि विरघळण्याकरिता त्याला वेळ लागला तर ते भेसळयुक्त आहे असे समजावे.
4- तुपाला उकळणे– या पद्धतीमध्ये तुम्हाला एका लहान भांड्यामध्ये थोडेसे तूप घ्यावे लागेल व त्याला एक उकळी काढून घ्यावी.त्यानंतर सामान्य तापमानामध्ये त्याला एका काचेच्या बाटलीमध्ये भरून घ्यावे व ही बाटली फ्रीजमध्ये ठेवून द्या. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर तूप पुन्हा घट्ट झाल्यावर यामध्ये भेसळ असलेले दोन वेगवेगळे लेयर म्हणजेच थर दिसले तर समजावे ते तूप भेसळयुक्त आहे.