file photo

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- पारनेर तालुक्यातील म्हस्केवाडी येथील शिंदे मळा रोडवर असलेल्या बाळू चोरमले यांच्या घोडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्याने परिसरातील पशुधन धोक्यात आले आहे.

यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे . याबाबत अधिक माहिती अशी कि, नुकतेच म्हस्केवाडी येथील कुणाल म्हस्के व धनंजय खामकर हे दोन तरुण अळकुटी येथून मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून घराकडे परतत असताना म्हस्केवाडी – माळवाडी रस्त्याच्या कडेला त्यांना वाघ दिसून आला.

त्यानंतर काल झालेल्या हल्ल्यात घोडी ठार झाल्याने हा हल्ला बिबटयाचा की पट्टेरी वाघाचा ? हा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. या घटनेची वन विभागास माहिती कळवताच वनपरिक्षेत्र अधिकारी सिमा गोरे, वनपाल नाना जाधव वनरक्षक गजानन वाघमारे,

वन कर्मचारी रंगनाथ वाघमारे यांनी घटनास्थळी पोहचत पंजाचे ठसे व मृत घोडीची पाहणी करून हा हल्ला बिबट्यानेच कल्याचे सांगितले . दरम्यान काही दिवसांपूर्वी आढळलेला पट्टेरी वाघ व बिबट्याचे वारंवार होणारे जनावरांवरील हल्ले यामुळे नागरिकांमध्ये कमालीचे घबटारीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबटयांस लपण्यासाठी जागा असून शेतकरी शेतीमध्ये काम करण्यासाठी जाण्यासही धजावत नाहीत . वनविभागाने योग्य उपाययोजना करुन बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे .