file photo

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यातील करोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी, तसेच १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असलेल्या गावांत कोविड नियमांचे पालन होत नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे १० दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने ६९ गावांत लॉकडाऊन केले होते. त्यापैकी ६१ गावात करोना नियंत्रणात आला आहे.

उर्वरित ८ गावांसह नव्याने १३ गावांमध्ये कोविड लॉकडाऊन (Ahmednagar Lockdown)जाहीर झाले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

आदेशात म्हटले आहे, जिल्ह्यात दैनंदिन करोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे ३०० ते ५०० आहे. तसेच जिल्ह्यातील करोना बाधित होण्याचे प्रमाण हे ३ ते ५ टक्के आहे.

जिल्ह्यात २० पेक्षा अधिक सक्रिय करोना रुग्ण असणाऱ्या गावात प्रतिबंधात्मक क्षेत्र जाहीर करणे, बॅरिकेटींग करणे, पोलिस बंदोबस्त वाढविणे, जनता कर्फ्यूच्या माध्यमातून गाव बंद करणे,

नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करणे, कोविड नियमानुसार वर्तणूक ठेवणे, चाचण्या वाढवणे, या उपाययोजना केल्या जात आहेत.

तरीही १० पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या गावात या उपाययोजना प्रभावीपणे राबवल्या जात नाहीत, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे सक्रिय करोना रुग्ण असणाऱ्या गावात अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, करोना चाचणी केंद्र वगळता अन्य सर्व १४ ऑक्टोबरला पहाटे १ वाजल्यापासून ते २३ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत बंद असतील.

या गावात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. गावाच्या हद्दीतून कृषी माल व आवश्यक वस्तूंची वाहतूक वगळता नागरिकांच्या येण्या-जाण्यावर बंदी असेल.

या गावांचा समावेश
लॉकडाऊन लागू केलेल्या गावांमध्ये वीरगाव, सुगाव बु., कळस बुद्रूक (अकोले), टाकळी (कोपरगाव), चांदा (नेवासे), जामगाव, वासुंदे (पारनेर), वेल्हाळे, उंबरी,

चंदनापुरी, वडगाव पान, राजापुर, नांदुरी दुमला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु, जोर्वे (संगमनेर), लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ (श्रीगोंदा), पिंपळगाव माळवी (नगर) या गावांचा समावेश आहे.