राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉनचा फैलाव वाढताना दिसत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची  घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे.

>> संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल.

>> लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या 100 च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते

>> इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या 250 च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के यापैकी जे कमी असेल ते.

>> उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी 25 टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

>> क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.

>> वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना 27 नोव्हेंबर 2021 चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.

>> उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 50 टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.

>> याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.

>> जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.

कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ

दरम्यान राज्यासह मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला 100 पर्यंत आलेली कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या पाचशे पार झाली आहे.

गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोनाचे १४१० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. आज राज्यात ८६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९७.६९ टक्के इतका झाला आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंटचे २० नवे रुग्ण

कोरोनाबरोबरच राज्यात ओमायक्रॉनचं संकटही वाढत आहे. राज्यात आत ओमायक्रॉन व्हेरिएंटचे २० नवे रुग्ण आढळले. यापैकी मुंबईत ११ रुग्ण आढळून आले आहेत. तर पुणे ६, सातारा २, आणि अहमदनगरमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे.

मुंबईत तब्बल सहाशेचा आकडा पार

मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत कोरोनाने तब्बल सहाशेचा आकडा पार केला आहे.

गेल्या चार दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात मुबंईत ६८३ रुग्णांची नोंद झाली आहे, तर २६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.कोरोनामुळे आज एका मृत्यूची नोंद झाली आहे.