उभ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल अशी घटना बदलापूर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी घडली होती व या घटनेमध्ये बदलापूर मधील एका शाळेत चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती व या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांच्या माध्यमातून अटक करण्यात आलेली होती.
परंतु याच अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत एन्काऊंटर झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनेचे पडसाद आपण उभ्या महाराष्ट्रात पाहिले.अशा प्रवृत्तींना हीच शिक्षा व्हावी किंवा व्हायला हवी अशा प्रकारचा सूर जनतेमध्ये दिसून आला व बऱ्याच ठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद देखील व्यक्त करण्यात आला.
तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पोलिसांचे व सरकारचे कौतुक करणाऱ्या अनेक पोस्ट फिरल्या. परंतु असे असताना मात्र या घटनेचे देखील राजकारण करू पाहणारे काही संधीसाधू चेहरे देखील समोर आल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली.
बदलापुरात घडलेली घटना व त्यानंतर उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया
बदलापूर येथील घटनेतील आरोपी अक्षय शिंदे हा एका प्रसिद्ध असलेल्या शाळेमध्ये सफाई कर्मचाऱ्याचे काम करत होता व रुजू झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात त्याने हे दुष्कृत्य केले. या शाळेत शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींनी जेव्हा याबाबत पालकांकडे तक्रार केली की आपल्या नाजूक ठिकाणी वेदना होत आहेत असे जेव्हा पालकांना त्या मुलींनी सांगितले तेव्हा यांच्या माध्यमातून शाळेवर देखील मोर्चा नेण्यात आला व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत ज्या पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला विलंब केला अशा अधिकाऱ्यांवर देखील या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात आली. परंतु जनतेच्या माध्यमातून मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटले व या घटनेच्या दुसऱ्या दिवशी थेट बदलापूरकरांनी रेल रोको करत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती व जवळपास दिवसभर हे आंदोलन सुरू होते.
आंदोलनाच्या बाबतीत देखील अनेक प्रतिक्रिया उमटल्या व यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की,हे आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित असून यामागे लोकभावना नाही.परंतु त्या दिवशी संध्याकाळी पोलिसांनी बळाचा वापर करत नाविलाजाणे जमाव पांगवला व तेव्हा कुठे हे आंदोलन मागे झाले.
त्यावेळी विरोधक झाले होते आक्रमक
ही घटना घडल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आंध्रप्रदेश प्रमाणे या आरोपीचा एन्काऊंटर करावा अशी मागणी केली होती व अशाच पद्धतीची काहीशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या(उबाठा) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून देखील आली होती.
अशा प्रकारच्या नराधमाला भर चौकात फाशी देण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती व विशेष म्हणजे ही मागणी करण्यामध्ये उद्धव ठाकरे व शरद पवार गट तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आघाडीवर होते.
त्यानंतर विरोधकांनी घेतला यु टर्न?
परंतु अक्षय शिंदे हा पोलीस चकमकीत मारला गेला किंवा त्याचे एन्काऊंटर झाल्यानंतर मात्र उभ्या महाराष्ट्रमध्ये याविषयी समाधान व्यक्त करण्यात आले. इतकेच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी तर चकमकीतील पोलिसांना बक्षीस देखील जाहीर केले. परंतु घटनेनंतर आरोपीला फाशीची मागणी करणारे विरोधकांनी मात्र त्यांच्या भूमिकेवरून अचानकच यू टर्न घेतल्याचे दिसून आले.
घटना घडली तेव्हा सुषमा अंधारे आंदोलन करत होत्या व आता पोलीस चकमकीत अक्षय शिंदे मारला गेल्यानंतर मात्र याच सुषमा अंधारे अक्षय शिंदेची हत्या केल्याचा आरोप पोलिसांवर करीत आहेत. तसेच या प्रकरणांमध्ये गृह खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा दावा शरद पवार यांनी केला.
तसेच महाविकास आघाडीतील जितेंद्र आव्हाड तसेच जयंत पाटील, अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्या देखील पोलिसांवर संशय व्यक्त करणाऱ्याच आहेत. त्यामुळे अशा घटनेच्या माध्यमातून देखील विरोधक राजकारण करत आहेत की काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडणार नाही तरच नवल.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या सगळ्या भूमिकेवर जनतेने मात्र त्यांना आता मोठ्या प्रमाणावर ट्रोल केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी खूप वर्षांनी चांगले काम केले व तुम्हाला आरोपीचा पुळका का असा सवाल देखील आता नेटकरी करीत असल्याचे दिसून येत आहे.
अक्षय शिंदे सारख्या नराधमाचे समर्थन का करता असा सवाल देखील आता सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारण्यात येत आहे. चार वर्षांच्या चिमुकलींच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकरणातील आरोपीच्या संदर्भात देखील विरोधक राजकारण शोधत असल्याचा आरोप आता सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.
या प्रकरणातील सत्य काय हे तपासांती समोर येईलच, परंतु या माध्यमातून इतक्या संवेदनशील विषयांमध्ये देखील नेतेमंडळी राजकारण शोधत असतात याची प्रचिती सर्वसामान्य जनतेला मात्र येताना दिसून येत आहे.