Maharashtra News : उन्हाची दाहकता आता वाढली आहे. या उन्हाचा जसा माणसाला त्रास होतो, तसाच तो जनावरांनाही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे, कारण या जनावरांनाही उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.
यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. एकीकडे औषधांवरही खर्च होतो व दुसरीकडे दुध उत्पादनावरही विपरित परिणाम होतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. ते विविध रोगांना बळी पडतात. त्यामुळे पशुपालकांनी गुरांना जपणे गरजेचे आहे. वाढत्या तापमानामुळे गुरांना उष्माघाताचा धोका लक्षात घेता पशुपालकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा मिळत नाही. परिणामी, त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. तालुक्यात उन्हाचा चटका आता वाढत आहे.
जनावरांना दिवसभरात लागणारा चारा एकाचवेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी त्याची बारीक कुट्टी करावी. चारा तसाच टाकला तर ३० टक्के वाया जातो. हिरवा चारा उपलब्ध असल्यास वाळलेला चारा यांचे मिश्रण करावे.
वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडाल्याने जनावरे अधिक आवडीने चारा खातात. अति उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर व प्रजननक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो, म्हणून जनावरांना रांजणातील पाणी पाजावे.
उन्हाळ्यात अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे जनावरे अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते व ते विविध रोगांना बळी पडतात, म्हणून पशुतज्ज्ञांकडून वेळीच जनावरांना लाळ खुरकूत, घटसर्प, फऱ्या रोगाची लस टोचावी.
परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे पाजावीत. जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ असावा. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावल्याने जनावरे आजारी पडणार नाहीत.
जनावरांच्या आरोग्याची घ्या काळजी
जनावरांसाठी सावली व चारापाणी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गुरांना जपण्यासाठी त्यांचे लसीकरण करून घेण्यासोबतच त्यांचा उन्हापासून बचाव करणेही गरजेचे आहे. जनावरांना लाळ्या खरकुत. घटसर्प, फन्या रोगाची लस टोचावी. परोपजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंतुनाशक औषधे पाजावीत.
गाभण जनावरे व दूध उत्पादक जनावरांची विशेष काळजी घ्यावी. जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ असावा. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावावी, असा सल्ला पशुतज्ज्ञांकडून दिला जात आहे. गुरांमध्ये उष्माघाताचे लक्षण आढळल्यास तात्काळ पशूवैद्यकांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले जात आहे.
दूध उत्पादनावर परिणाम
सध्या उन्हाच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे त्यात गुरांना हिरवा चारा मिळत नाही. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होत आहे. वाढत्या उष्णतेचा जनावरांच्या आहारावर, दूध उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
दुग्धजन्य जनावरांना दिवसातून सकाळ, संध्याकाळ, व दुपारी अशा प्रकारे तीन वेळा चारापाणी न दिल्यास उत्पादनात घाट होते. तसेच शक्य असेल तर हिरवा चारा किंवा पेंड खाऊ घालावी. यामुळे दुध उत्पादनात घट होणार नाही.