Drought In Maharashtra:- यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर्षी पावसाची सुरुवात खूप निराशाजनक झालेली होती. संपूर्ण पावसाच्या कालावधीमधील जुलै आणि सप्टेंबरचा कालावधी वगळला तर जून आणि ऑगस्ट हे महत्त्वाचे महिने पावसाविना कोरडेच गेले.
ऑगस्ट महिन्यामध्ये तर पावसाने खूप मोठा खंड दिला. त्यामुळे राज्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात खरिपाच्या पिकांवर खूप विपरीत परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ज्या ठिकाणी 75% पेक्षा कमी पाऊस झालेला आहे अशा सातारा जिल्ह्यातील 77 मंडलांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केलेली आहे. या दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झालेल्या मंडलांमध्ये शेतकऱ्यांसाठी काही सवलती देण्यात येणार आहेत.
दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळातील शेतकऱ्यांना मिळणारी या सवलती
यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगाम मोठ्या प्रमाणावर अडचणी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी तसेच विविध पक्षाचा संघटनांच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत होती व त्यानुसार राज्य शासनाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील 77 मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये माण, खटाव तसेच फलटण व कोरेगाव तालुक्यातील मंडलांचा समावेश असून जिल्ह्यातील पहिला दुष्काळाच्या यादीमध्ये केवळ वाई तसेच खंडाळा तालुक्याचा समावेश करण्यात आला होता. परंतु आता सर्व तालुक्यातील बरेच मंडळांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यातील केवळ 14 मंडळात 75% पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे ही मंडले निकषांमध्ये बसलेली नसून उर्वरित 77 मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. या मंडळामधील शेतकऱ्यांना आता आर्थिक मदत किती मिळणार याची देखील उत्सुकता लागून राहिलेली आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना जमीन महसुलामध्ये सूट देण्यात येणार आहे तसेच सहकारी कर्जाचे पुनर्गठन देखील करण्यात येणार आहे. याशिवाय शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्यात येणार आहे. कृषी पंपाच्या चालू वीजबिलात मध्ये 33.5% ची सूट मिळणार आहे.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात देखील माफी मिळणार आहे. आवश्यक त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी टंचाई जाहीर करण्यात आलेली आहे अशा गावातील शेती वीज कनेक्शन खंडित न करणे इत्यादी सवलती देखील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.