Costal Road Mumbai:- मुंबई म्हटले म्हणजे प्रचंड प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी सगळ्यात अगोदर आपल्या डोळ्यासमोर येते.तुम्हाला जर मुंबईमधील ३० ते ३५ किलोमीटरचे अंतर पार करायचे असेल आणि ते जर तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी पार करत असाल तर मात्र दोन ते तीन तासाचा देखील वेळ लागू शकतो.
इतक्या मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक मुंबईमध्ये असते.त्यामुळे मुंबईकरांची ट्रॅफिकच्या समस्येपासून मुक्तता व्हावी याकरिता अनेक महत्वाची अशी प्रकल्प हाती घेण्यात आलेली आहेत व त्यातील बऱ्याच प्रकल्पांची कामे आता पूर्ण होत आली आहेत. तर काही प्रकल्पांची कामे ही प्रस्तावित आहेत व काही प्रगतीपथावर आहेत.
त्यामुळे मुंबईकरांना खूप मोठा दिलासा मिळताना दिसून येत आहे. प्रामुख्याने आता जलद प्रवास करणे सोपे होत असून वाहतूक कोंडीच्या समस्येपासून देखील मुंबईकरांची सुटका झालेली आहे. याच प्रकल्पांच्या अनुषंगाने जर बघितले तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोस्टल रोडच्या विस्तार करण्याबाबतची एक मोठी घोषणा केली आहे.
कोस्टल रोडचा विस्तार हा मुंबईतील नरिमन पॉईंट पासून ते पालघर जिल्ह्यातील विरार पर्यंत केला जाणार आहे. आपल्याला माहित आहे की विरार मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग असून लवकरात लवकर नरिमन पॉईंट ते विरार पर्यंत कोस्टल रोडचं बांधकाम पूर्ण केले जाणार असून हे काम पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट ते विरार हे एक तास वीस मिनिटांचे अंतर फक्त 35 ते 40 मिनिटात पूर्ण करता येणार.
याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय दिली माहिती?
कोस्टल रोडच्या विस्ताराबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, जपान सरकार कोस्टल रोड विरार पर्यंत वाढवण्याकरिता 54 हजार कोटी रुपये देणार आहे. तसेच दुसरीकडे वर्सोवा ते मढ लिंक पर्यंतच टेंडर आधीच जारी करण्यात आले आहे.
तसेच मढ ते उत्तान लिंक पर्यंतच काम आता सुरू होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. इतकेच नाही तर कोस्टल रोड हा मुंबईच्या पश्चिम किनार्यावरील आठ लेनचा असणारा असून तो 29.2 किमी लांबीचा वेगळा एक्सप्रेस वे असून दक्षिणेकडील मरीन लाईन्स ते उत्तरेकडे कांदिवली यांना एकत्र जोडण्याचे काम करतो.
याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन 11 मार्च 2024 रोजी करण्यात आले आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाय ओव्हर ते बांद्रा वरळी सीलिंक पर्यंत 10.58 कीमी इतका लांब आहे.
कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे
11 मार्च 2024 रोजी वरळी आणि दक्षिण मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह दरम्यानचा जो काही कोस्टल रोड आहे त्याच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले आहे.
12 मार्च 2024 रोजी पहिल्या टप्प्यातील साधारणपणे 10.5 किलोमीटर लांबीचा मार्ग तेव्हा खुला करण्यात आला होता. 13 ऑक्टोबर 2018 रोजी या मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते व याकरिता 12721 कोटी रुपये खर्च आला आहे.
वांद्रे ते विरार 43 किमीचा कोस्टल रोड होणार
तसेच वांद्रे ते विरार पर्यंत कनेक्टिव्हिटी असणाऱ्या समुद्री मार्गाकरिता आता एमएमआरडीएने मंजुरी दिली असून कोस्टल रोडचा विस्तार आता वसई विरार पर्यंत केला जाणार आहे. वर्सोवा विरार सी लिंकची निर्मिती देखील एमएमआरडी कडून केली जात असून या 43 किलोमीटर लांबीच्या मार्गाकरिता 63 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.