Land Measurement: जमिनीची शासकीय मोजणी करायची आहे का? वाचा या मोजणीची ए टू झेड माहिती

Land Measurement:- शेत जमिनीच्या बाबतीत बहुसंख्य जे वाद आपल्याला निर्माण झालेले दिसतात ते प्रामुख्याने शेतरस्ता, शेताचा बांध कोरणे, सातबारा वर जेवढे क्षेत्र आहे त्यापेक्षा कमी क्षेत्र प्रत्यक्षात ताब्यात असणे याच्याशी संबंधित जास्त प्रमाणात दिसून येतात.

कारण बऱ्याच प्रसंगी सातबारावर जेवढे क्षेत्र असते त्यापेक्षा कमी क्षेत्र शेतकऱ्याच्या ताब्यात असल्याचे जाणवते व त्यामुळे अनेकदा वाद उद्भवतात. कधी कधी हे वाद कोर्टाच्या दारापर्यंत जातात. यामध्ये आपल्या क्षेत्रावर शेजारच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याची शंका देखील बऱ्याचदा निर्माण होत असते.

अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर जमिनीची मोजणी हा एक महत्त्वाचा पर्याय आपल्याकडे राहतो. जमिनीची मोजणी काही खाजगी व्यक्तींकडून देखील केली जाते. परंतु यामध्ये शासकीय मोजणीला अनन्य साधारण महत्व असल्यामुळे बरेच व्यक्ती अशाप्रसंगी शासकीय मोजणीला प्राधान्य देताना दिसून येतात.

परंतु बऱ्याचदा शासकीय जमीन मोजणी करिता कशा पद्धतीने प्रक्रिया असते? याबद्दलची माहिती बऱ्याचदा आपल्याला नसते. त्यामुळे या लेखात आपण शासकीय मोजणीसाठी अर्ज कसा करायचा आणि त्याकरिता कुठली कागदपत्रे लागतात? याबाबतचे महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

 जमीन मोजणीचे तीन प्रकार कोणते?

1- जमीन मोजण्याचे तीन प्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार पाहिला तर तो साधी मोजणी हा असून या प्रकारचे मोजणी ही सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केली जाते.

2- दुसरा प्रकार हा तातडीची मोजणी हा असून या प्रकारामध्ये जमिनीची मोजणी तीन महिन्यांमध्ये करणे गरजेचे असते.

3- तिसरा प्रकार हा अति तातडीची मोजणी हा असतो व या प्रकाराचे मोजणी दोन महिन्याच्या आत केली जाते.

 प्रकारानुसार जमीन मोजण्यासाठी किती शुल्क लागते?

1- तुम्हाला जर साधी मोजणी करायची असेल तर त्याकरिता एक हजार रुपये शुल्क भरावे लागते.

2- तातडीच्या मोजणी करता दोन हजार रुपये शुल्क लागते.

3- अतितातडीच्या मोजणी करिता तीन हजार रुपये शुल्क आकारले जाते.

 मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करावा?

तुम्हाला देखील तुमच्या शेतीच्या हद्दीबाबत काही समस्या किंवा शंका असेल आणि तुमची शासकीय मोजणी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही त्याकरिता तुमच्या तालुकास्तरावरील भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या ऑफिसमध्ये अर्ज करू शकतात.

यासाठी जो काही अर्ज लागतो त्याचा नमुना तुम्हाला सरकारच्या bhumiabhlekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हा अर्जाचा नमुना घेऊन तुम्ही अर्ज करताना सर्वात आधी….

1- तुम्हाला ज्या तालुक्यातील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करायचा आहे त्या तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव टाकणे गरजेचे आहे.

2- त्यानंतर पहिल्या पर्यायापुढे अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता या विषयी माहिती भरायचे आहे. त्यामध्ये अर्जदाराचे नाव, गावाचे तसेच जिल्हा व तालुक्याचे नाव लिहिणे गरजेचे आहे.

3- त्यानंतर दुसरा पर्याय हा मोजणी करण्यासाठी ची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील हा असून यामध्ये मोजणीच्या प्रकारासमोर मोजणीचा कालावधी आणि उद्देश लिहिणे गरजेचे आहे. तसेच तालुका व गावाचे नाव आणि संबंधित शेत जमीन ज्या गट क्रमांक देते तो गट क्रमांक टाकणे गरजेचे आहे.

4- दुसरा कॉलम हा सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम हा असतो व यासमोर मोजणी फीची रक्कम लिहिणे गरजेचे असते. यामध्ये तुम्ही भरलेले चलन किंवा पावतीचा क्रमांक आणि दिनांक लिहावा. यासाठी तुम्ही भरत असलेले शुल्क हे तुम्हाला किती क्षेत्रावर मोजणी करायचे आहे व किती कालावधीमध्ये करायचे आहे यावरून निश्चित होत असते.

5- त्यानंतर उद्देश हा पर्याय येतो. यामध्ये तुम्हाला शेत जमिनीची मोजणी का करायची आहे म्हणजेच तुम्हाला शेतजमिनीचे हद्द माहित करून घ्यायचे आहे किंवा बांधावर अतिक्रमण केलं आहे का हे बघायचं आहे. या पद्धतीचा नेमका मोजणी मागील तुमचा उद्देश काय आहे हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लिहिणे गरजेचे आहे.

5- तसेच यापुढे जो काही पर्याय येतो तो म्हणजे सातबारा उतारा प्रमाणे जमिनीचे सहधारक हा असून यामध्ये ज्या गट क्रमांकाची तुम्हाला मोजणी करायचे आहे त्या क्रमांकाचा सातबारा उतारा एकापेक्षा जास्त जणांच्या नावावर असेल तर त्यांची नावे, त्या व्यक्तींचा पत्ता आणि मोजणीसाठी त्यांची संमती आहे का अशा पद्धतीच्या संमती दर्शक सह्या आवश्यक असतात.

6- त्यानंतर लगतचे कब्जेदार हा पर्याय असतो व यामध्ये लगतच्या म्हणजे तुमच्या शेजारील कब्जेदारांची नावे आणि पत्ता लिहिणे गरजेचे असते. तुमच्या शेताच्या चारही बाजूंनी ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांचे नाव व पत्ता त्यांच्या शेताच्या दिशेनुसार लिहावा.

अर्जासोबत ही कागदपत्रे जोडावीत

शेत जमिनीची मोजणी आणण्याकरिता तुम्हाला मोजणी करण्यासाठी चा अर्ज, मोजणी शुल्काचे चलन किंवा पावती, जमिनीचा तीन महिन्याच्या आतील सातबारा इत्यादी कागदपत्रे लागतात. तसेच तुम्हाला शेतजमिनीच्या व्यतिरिक्त इतर जमिनीवर असलेली स्थावर मालमत्ता जसे की घर,

बंगला किंवा उद्योगाची जमीन यांची देखील मोजणी करायची असेल किंवा हद्द निश्चित करायचे असेल तर  याकरता तुम्हाला तीन महिन्याची मिळकत पत्रिका आवश्यक असते. हे सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्रांसहित हा मोजणीचा अर्ज संबंधित कार्यालयामध्ये जमा करावा लागतो.

 अर्ज केल्यानंतरची प्रक्रिया कशी असते?

सर्व कागदपत्रांसाठी तुम्ही अर्ज संबंधित कार्यालयात जमा केला की तो ई मोजणी या प्रणालीमध्ये दाखल केला जातो व कागदपत्रांची तपासणी करून त्या मोजणी करिता किती शुल्क लागणार आहे याचं चलन जनरेट केले जाते. हे चलन जनरेट झाल्यानंतर शेतकऱ्याने ते चलन बँकेमध्ये जाऊन भरणे गरजेचे असते.

त्यानंतर तुम्हाला मोजणीचा रजिस्टर नंबर म्हणजेच नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी तयार होतो व तो तयार झाल्यानंतर शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहच दिली जाते. यामध्ये मोजणीच्या दिनांक तसेच कोणता कर्मचारी येणार आहेत त्या कर्मचाऱ्यांचे नाव आणि त्याचा मोबाईल क्रमांक व कार्यालयीन प्रमुखाचा मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती दिलेली असते.

अशा पद्धतीने तुम्ही शासकीय मोजणी आणू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe