नैऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) केरळमध्ये दाखल झाला आहे. येत्या दोन दिवसांत मान्सून कर्नाटकमध्ये दाखल होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश भागात येत्या ४८ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
सध्या मान्सून वेगाने पुढे वाटचाल करीत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कर्नाटक राज्यामध्ये येणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सूनने शुक्रवारी ईशान्य बंगालच्या उपसागराचा उर्वरित भाग, वायव्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, त्रिपुरा, मेघालय आणि आसामचा उर्वरित भाग, तर हिमालयाकडील पश्चिम बंगालचा बहुतांश भाग आज व्यापला आहे.
तर पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून मध्य अरबी समुद्राचा आणखीन काही भाग व्यापणार आहे. दक्षिण अरबी, लक्षद्वीप व केरळचा उर्वरित भाग, कर्नाटकचा काही भाग, तामिळनाडू व नैऋत्य बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापण्यासाठी मान्सूनला अनुकूल वातावरण असल्याचे हवामानशास्त्र विभागाच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील कोकण- गोव्यातील बहुतांश भाग, मध्य महाराष्ट्रातील काही भाग, तर विदर्भातील तुरळक ठिकाणी पुढील ४८ तासांत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० एवढा असेल. त्यामुळे येथील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.