Navratri 2021 : राज्यात ‘असा’ साजरा होईल नवरात्रौत्सव ! वाचा संपूर्ण नियमावली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार योग्य पद्धतीने पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. (Navratri festival will be celebrated in the state! Read the entire manual)

> कोविड-१९मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाच्या मंडपाबाबतच्या धोरणाशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत.

> यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तींची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी.

देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी ४ फुटांची, तर घरगुती देवीच्या मूर्तीची उंची २ फुटांचीच असावी.

> शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातूच्या किंवा संगमरवरच्या मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास अशा मूर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्याघरीच करावे.

> देवीच्या मूर्तीचे विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

> नवरात्रौत्सवासाठी वर्गणी किंवा देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा.

> जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पाहावे.

> तसेच आरोग्य विषयक आणि सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी.

> गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्यांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य द्यावे. या द्वारे मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय, तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.

> देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन
देण्याबाबत जास्तीतजास्त व्यवस्था करण्यात यावी.

देवीच्या मंडपामध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

> आरती, भजन, किर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजिक करताना गर्दी होणार नाही, तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे आणि तरतुदींचे पालन करण्यात यावे.

> मंडपात एकावेळी ५ पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल.

> देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत.

> विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

> लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील किंवा इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.

> महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी . तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीतजास्त प्रसिद्धी देण्यात यावी.

> विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात येत असेल, तर मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.