नाशिक, दि. 28 (जिमाका) : जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या स्व. डॉ.वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे स्थापन करण्यात आलेली स्वॅब तपासणी लॅबचे काम आजपासून सुरु झाले आहे.
कोरोनाची प्राथमिक तपासणी या लॅबच्या माध्यमातून होणार असून त्यामुळे रुग्णांचे निदान तात्काळ होऊन पुढील निर्णय घेणे सहज शक्य होणार आहे.
या लॅबच्या माध्यमातून दिवसाला 180 नमुने तपासणी होणार असून दुसरे यंत्रही लवकरच कार्यरत झाल्यावर त्याची क्षमता 360 पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे अधिक रुग्णांची तपासणी होणार असल्याने या लॅबचा फायदा जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला होणार असल्याचे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या स्व. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे स्थापन करण्यात आलेल्या टेंस्टींग लॅबच्या पाहणी प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, मविप्रच्या सरचिटणीस निलीमाताई पवार , शिक्षणाधिकारी एन.एस.पाटील, अधिष्ठाता डॉ.मृणाल पाटील, डॉ.दादासाहेब दातार, स्नेहा दातार, डॉ. प्रशांत गांगुर्डे उपस्थित होते.
श्री.भुजबळ म्हणाले, लॅब तयार करण्यासाठी मविप्र व दातार लॅब यांचेकडील साधने व तंत्रज्ञान यांचे एकत्रिकरण केले व एक सुसज्ज अशी लॅब आज तयार करण्यात आली असून जिल्ह्यासाठी खरच एक आनंदाची बाब आहे.
पुण्याला स्वॅब रिपोर्ट पाठविण्याची जी आरोग्य यंत्रणेची धावपळ होत असे ती या लॅबमुळे थांबणार आहे. रिपोर्ट तातडीने आल्याने रुग्णांचे क्वारन्टाईन व्यवस्थापनेचे काम सुद्धा सोपे होणार आहे. लॅब सुरु करण्याचे यश प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या पाठपुराव्यामुळे आले असल्याचे श्री.भुजबळ म्हणाले.
लॅब मध्ये दिवसाला 540 टेस्ट करण्याची क्षमता : विभागीय आयुक्त राजाराम माने
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी, या रोगाचे तात्काळ निदान होण्यासाठी टेस्टींग लॅबचा फायदा जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. लॅब मध्ये 24 तासात 540 टेस्ट होणार असल्याचे श्री.माने यांनी सांगितले.
आपल्या हातात महत्त्वाचे आयुध जिल्हाधिकारी सूरज मांढरे
अत्याधुनिक स्वॅब टेस्टिंग लॅबच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलेल्या संशयित रुग्णांचे अहवाल त्वरीत मिळण्यास मदत होवून पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी उपाययोजना करणे आरोग्य यंत्रणेला शक्य होणार आहे.
तसेच लॅब सुरु होण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अनेक लोकांनी परिश्रम घेतले असून त्याचेच फलित आज लॅबच्या रुपाने बघायला मिळते आहे. येणाऱ्या काळात कोरोनाचे व्यवस्थापन सक्षम करण्यास या लॅबचा मोठा वाटा असणार आहे. तसेच लॅबच्या रुपाने जिल्ह्याला महत्त्वाचे आयुध मिळाले असल्याचे श्री.मांढरे म्हणाले.
टेस्टींग लॅब येथे मायक्रोबायोलॉजी विभागाचे डॉ. निता गांगुर्डे, डॉ.रुपाली गांगुर्डे, डॉ.मिलिंद देशपांडे, डॉ.रुपाली पवार, डॉ.सुनिता फटाले ही टीम काम पाहणार आहे. तसेच टेक्निकल टीमचे काम मिना रत्ने, वीणा सोनवणे, तुषार वांरुगसे, सोपान पिंगळे, कावेरी वाघ, संपतराज, श्रीनिवास फडके हे पाहणार आहेत.