औरंगाबाद – औरंगाबादेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात ओवेसी यांना हिरवा साप म्हटले होते. यासह त्यांनी लावलेला झेंडा उखडून फेकण्याचे आवाहन जाहीर सभेत केले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना शुक्रवारी ओवेसी म्हणाले की, मी लावलेला झेंडा काही बांबूत लावलेला नाही.
तो औरंगाबादकरांच्या मनात लावलेला असून तो यापुढे कायम राहणार आहे. भीतीचे राजकारण करून सत्ता भोगण्यात भाजप आणि शिवसेना अग्रेसर आहे. त्यांच्या भूलथापांना मतदारही बळी पडतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ३७ टक्के हिंदू समाज भाजपच्या पाठीशी होता.
त्याचे प्रमाण २०१९ मध्ये ४४ टक्के झाले असून, सहा टक्के मुस्लिम मतदारांनीही त्यांना मदत केल्याचे आकडे खासदार ओवेसी यांनी सभेत मांडले. मात्र, वंचित समाजासह मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार हात आखडता घेते. त्यामुळे आपले प्रश्न, समस्या मांडण्यासाठी आपल्या माणसांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले.