अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे यांचा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून झाला.

धनशक्तीमुळेच त्यांना मताधिक्य मिळाले, अशी टीका नगर लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केली.

शहरातून डॉ. विखे यांना मताधिक्य मिळाले असले, तरी विधानसभा निवडणूक वेगळी असून मी विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचेही आमदार जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. विखे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार जगताप यांचा पराभव केला. या निवडणुकीच्या निकालानंतर आमदार जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली.

जगताप म्हणाले, विखेंचा विजय मोदी लाटेमुळे व धनशक्तीमुळे झाला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या २२ दिवसांत आम्ही प्रचार केला.

त्या तुलनेत मला मिळालेली मते महत्त्वाची आहेत. त्याबद्दल मतदार आणि दोन्ही काँग्रेस, तसेच मित्र पक्षांचे मी आभार मानतो. माझी उमेदवारी लवकर जाहीर झाली असती, तर चित्र वेगळे असते.

मात्र, आता आम्ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. डॉ. विखे यांना त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी, तसेच विकासकामांसाठी शुभेच्छा आमदार जगताप यांनी दिल्या.

दरम्यान, कोणाचा हिशेब कसा चुकता करायचा हे जनता ठरवणार आहे. कमी वयात निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. या निवडणुकीतून मला खूप काही शिकता आले.

लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे नेते कार्यकर्ते, गावपातळीवरील कार्यकर्ते व मतदारांनी सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले.