छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हा अभ्यासाचा विषय आहे. राकट, कणखर आणि दगडांच्या देशात महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याची मर्मस्थानं होती त्यातले गड कोट दुर्ग.महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे इथल्या डोंगरी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाल आहे.
ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती आसपासचा मुलुख हे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीतलं मूळ तत्व होतं. १६४६ मध्ये तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधलं.
त्यानंतर राजकीय आणि लष्करी वाटचालीत किल्ल्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा आढावा घेतला असता शिवाजी महाराजांच्या कल्पकतेचा ठसा त्यांच्या प्रत्येक किल्ल्यावर आढळतो.
दुर्गम :
महाराष्ट्राच्या कडे-कपारीत कमीत कमी साधनसामुग्रीच्या आधारे लष्करी ताकद उभी करताना महाराजांनी अनेकदा गनिमी काव्याचा वापर केला. या युद्धतंत्राला पूरक अशीच आपली सत्ताकेंद्रे असावीत याची काळजी त्यांनी घेतली. प्रत्येक गड निवडताना त्यावर एखादीच सोपी वाट असावी व अन्य बाजूंनी गडाला नैसर्गिक दुर्गमता असावी हा निकष त्यांनी वापरला होता. जवळजवळ प्रत्येक किल्ला, डोंगराळ दुर्गम भागात, जमिनीवरून तोफा डागल्यास त्यांच्या पल्ल्याबाहेर असावा अशा प्रकारे जागा निवडून बांधण्यात आला आहे. गडावर जाणाऱ्या सुलभ मुख्य वाटेवर मजबूत बुरुज, दरवाजे बांधले आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराखेरीज इतर ठिकाणांहून लपून छपून हल्ला करता येतो ह्याची जाणीव महाराजांना होती. त्यांनी स्वतःच हे तंत्र अनेकदा वापरलेही होते. तेंव्हा अशाप्रकारच्या चोरवाटा गडावर राहू नयेत याकरता खास दक्षता घेण्यात येत असे. स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड बांधून घेतल्यावर त्याची दुर्गमता पडताळून पाहण्यासाठी महाराजांनी जाहीर बक्षीस लावले. गडावर जाणाऱ्या मुख्य वाटेखेरीज अन्य कोठूनही दोरखंड किंवा इतर साधनांच्या मदतीशिवाय चढून जाण्याची ही पैज एका गरीब धाडसी तरुणाने जिंकली तेंव्हा महाराजांनी त्याचा सत्कार करून त्याला सोन्याचे कडे बहाल केले, आणि तो ज्या मार्गाने आला तेथे तटबंदी घालून ती बाजू अभेद्य बनवली.
मोक्याचे ठिकाण:
महाराजांचे सर्व किल्ले जिंकण्याच्या दृष्टीने दुर्गम असले तरी अत्यंत मोक्याच्या ठिकाणी होते. म्हणजे गडावरून आसपासच्या प्रदेशाशी सहज संपर्कही साधता येत असे व प्रदेशावर नजरही ठेवता येत असे. सर्व गडांवर पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय असे, जेणेकरून शत्रूचा गडाला वेढा जरी पडला तरी गड दीर्घकाळ लढवता येत असे. गडाच्या आश्रयाने लहान लहान वाड्या उभ्या रहात, त्यात शेतकरी, पशुपालक, लहानसहान कारागीर यांची वस्ती असे. हे लोक गडाच्या दैनंदिन गरजा पुरवत असत.त्यांची स्थावर मालमत्ता फारशी नसल्याने ते आसपासच्या प्रदेशात सतत ये-जा करू शकत व दळणवळणाने स्वराज्याची मूळ मराठी मातीत व मराठी मनांत घट्ट रोवली जात असत. परचक्र किंवा शत्रूचा वेढा पडल्यास या लोकांना आपला संसार उचलून गडावर आसरा घेणं सोप जात असे. गडाच्या पायथ्याजवळ पक्की इमारत बांधायला बंदी होती. यावरून गडाच्या सुरक्षेविषयी आणि अभेद्यतेविषयी महाराजांनी किती बारकाईने विचार केला होता हे लक्षात येईल.
साधेपणा:
भारतात किंवा जगात इतरत्रही ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्यात आलेल्या किल्ल्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले वेगळे उठून दिसतात ते त्यांच्या साधेपणाने. गरीब रयतेचा राजा हे महाराजांचं नामाभिधान किती सार्थ होतं ते किल्ल्यांची रचना पाहून पुरेपूर पटत. वस्तुतः शिल्पकला, चित्रकला यांचा उत्तमोत्तम अविष्कार किल्ल्यांवर करणं ही भारतातील राजा महाराजांची प्रथा. असे अनेक किल्ले आजही आपल्याला इतरत्र भारतभर पाहायला मिळतात पण शिवरायांच्या किल्ल्यांवरच्या बांधकामाचे अवशेष पाहिले तर त्यांच्या राहणीतला साधेपणा उठून दिसतो. कोणताही अवास्तव डामडौल नाही, केवळ स्थापत्यशास्त्रातले सौंदर्य दाखवणारे छज्जे, महाल, गवाक्षे, कमानी ह्यांचा अभाव चटकन जाणवतो. किल्ल्यांच्या अभेद्यतेसाठी आणि रयतेच्या सुरक्षिततेसाठी सढळ हस्ताने खर्च करणारा हा राजा स्वतः किती साधेपणाने राहत होता याची साक्ष पटते. राजधानी म्हणून वसवलेल्या रायगडावर सुद्धा राजांच्या महालांचा डामडौल न दिसता बाजारपेठांची लोकाभिमुख रचना आणि दरबाराच्या रचनेतील कुशलताच लक्ष वेधून घेते.
शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला. आयुष्यभर त्यांनी किल्ल्यांवर प्रेम केले व त्यांचे उत्तम जतन केले. त्यांच्या कारकिर्दीत ३६० किल्ले त्यांच्या ताब्यात होते. गडाच्या डागडुजिवर जेंव्हा अष्टप्रधानांपैकी काहींनी नाराजी व्यक्त केली तेंव्हा महाराजांनी दिलेले उत्तर होते “दिल्लीन्द्रासारखा शत्रू उरावर आहे, तो आला तरी नवे जुने ३६० किल्ले हजेरीस आहेत. एक एक किल्ला वर्ष वर्ष लढला तरी ३६० वर्षे पाहिजेत. मसलत पडेल तेथे कुमक करून, शत्रूस पाहता दुसरा लाविला असता शेकडो वर्षेही राज्य जाणार नाही. दोन रुपये कम जास्त खर्च हा प्रपंच नव्हे”