ठाकरे क्लीन बोल्ड; महायुती मारणार षटकार !

Ahmednagarlive24 office
Published:
Maharashtra News

Maharashtra News : राज्यात आम्ही सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे क्लीन बोल्ड झाले आहेत. गेल्या २० वर्षांत त्यांनी काहीच काम केले नाही. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत महायुती मुंबईत षटकार मारेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला.

शिवसेना लढवत असलेल्या मुंबईतील तीन लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शिवसेनेने बाळासाहेब भवन येथे शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक घेतली. तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार रवींद्र वायकर,

यामिनी जाधव आणि राहुल शेवाळे, तसेच माजी खासदार गजानन कीर्तिकर, माजी खासदार संजय निरुपम, शिवसेनेचे त्या मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मुंबईत धनुष्यबाणाच्या चिन्हावर आम्ही तीन मतदारसंघांत निवडणूक लढवत आहोत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची पुढील रणनीती, भूमिका आणि निवडणूक प्रचार याबाबतचा आढावा घेतला. अगदी चांगल्या प्रकारची बांधणी झाली असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे,

अशा सूचना शिंदे यांनी यावेळी दिल्या. मुंबईत शिवसेनेच्या वाट्याला तीन, तर भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या असून महायुतीच्या एकूण सहा जागा आम्ही जिंकू, असे वातावरण आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.

‘तुम्ही षटकार मारणार, तर विकेट कुणाची जाणार?’ असा प्रश्न त्यांना विचारला असता, शिद म्हणाले. त्यांची विकेट आधीच गेली आहे. ते क्लीन बोल्ड झाले आहेत. लोकांना फील्डवर येऊन काम करणारा मुख्यमंत्री हवा आहे.

विकास हवा आहे, आम्ही घरात बसून काम करत नाही. ग्राऊंडवर उतरून काम करत आहोत. त्यामुळे कोण काम करते आणि कोण नाही हे लोकांना कळून चुकले आहे, असे उत्तर शिंदे यांनी दिले.

संजय निरुपम सेनेत प्रवेश करणार

काँग्रेसमधून हकालपट्टी केलेले संजय निरुपम लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली. निरुपम यांनीही आपण शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मी आता जोरात काम, जोरदार प्रचार करणार आहे. बऱ्याच वर्षांनंतर शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे पुन्हा एकदा माझ्या घरात आल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया निरुपम यांनी दिली.

मुंबईत मोदींच्या दोन सभा होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईत दोन सभा होणार आहेत. यासाठी त्यांना विनंती केली आहे. मोदींचे मुंबईवर प्रेम आहे. मुंबईतील अनेक विकासकामांना पंतप्रधानांनी हजेरी लावली आहे. त्यामुळे ते आमच्या विनंतीला मान देऊन मुंबईत सभा घेतील, अशी आशा आहे, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe