राज्यात गुंडांवरची पहिली ‘बुलडोझर’ कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : सातारा शहरालगतच्या प्रतापसिंहनगर येथील झोपडपट्टीतील कुख्यात गुंड दत्ता जाधव, त्याचा मुलगा ललन जाधव यांनी गुंडगिरीचा कहर केला आहे. पोलिसांनी त्यांना कायद्याचा हिसका दाखवून ‘मोक्का’ मध्ये कारागृहात टाकले आहे.

तरीही त्यांच्या गुंडांकडून किरकोळ उचापती सुरूच होत्या. महसूल व पोलीस प्रशासनाने बुधवारी त्यांना दणका दिला. शासकीय जमिनीवर बांधलेली घरे, इमारती सकाळीच जमीनदोस्त केल्या. महाराष्ट्रातील ही गुंडांवरची पहिलीच ‘बुलडोझर’ कारवाई ठरली आहे.

तब्बल दोन दशकांपासून प्रतापसिंहनगर (खेड, ता. सातारा) येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या गुंड दत्ता जाधव याने आपले साम्राज्य निर्माण केले होते. किरकोळ चोऱ्यामाऱ्या, भंगार चोरी ते खंडणी, प्राणघातक हल्ले, पोलिसांवर हल्ला असा त्याच्या गुंडगिरीचा प्रवास राहिला आहे. त्यात त्याचा मुलगा ललन ऊर्फ अजय जाधव यानेही गुंडगिरी करणे सुरूच ठेवले होते.

तडिपार असतानाही त्याने काही दिवसांपूर्वी प्रतापसिंहनगरात येऊन अल्पवयीन मुलीच्या पोटात चाकू भोसकला होता. त्यामुळे प्रतापसिंहनगरातील गुंडगिरीचा बीमोड करण्याचा निर्धार प्रशासनाने केला.

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी एकत्रित चर्चा करून ही कारवाई करण्याचे निश्चित केले. त्यानुसार पहाटे ५.३० च्या सुमारास पोलीस फौजफाट्यासह प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड,

पोलीस अधिकाऱ्यांनी जेसीबीद्वारे अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात केली. यामध्ये दत्ता जाधव व त्याचा भाऊ युवराज जाधव यांचे दुमजली, तीन मजली बंगले जमीनदोस्त केले. तसेच इतरही गुन्हेगारांची घरे अतिक्रमणे ठरवत पाडली. या कारवाईत २२ घरे पाडण्यात आली. महाराष्ट्रात गुंडांची घरे पाडण्याची अशी प्रथमच कारवाई करण्यात आली.