file photo

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- दररोज मला राज्यभरातील हजारो लोक भेटतात. त्याच प्रकारे काँग्रेसचे युवा कार्यकर्ते किरण काळे त्यांच्या सहकाऱ्यांसह मला घरी भेटले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.

कोरोना काळात नागरीकांना मदत महत्वाची आहे. ही वेळ राजकारणाची नाही. काळे यांनी भेटीचा विपर्यास करून गैरसमज करू नये असा खुलासा आमदार नीलेश लंके यांनी केला आहे.

या भेटीमध्ये कोरोना काळात आम्ही केलेल्या कामाविषयी त्यांनी माझा सत्कार करण्याची इच्छा प्रकट केली होती. आपण त्यांनी आणलेला हार त्यांनाच देत कोरोना काळात नागरीकांची सेवा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर ते तेथून निघून गेले. मला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तींशी मी कधीही बंद दाराआड चर्चा करीत नाही. जी काही चर्चा होते ती सर्वांसमक्षच होते हे सर्वजण जाणतात.

जिल्हयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याचा नेहमीच प्रमाणीकपणे प्रयत्न करीत आहे. कोणी कोणत्याही भेटीचा विपर्यास करून दुही माजविण्याचा प्रयत्न करू नये असेही लंके म्हणाले.

निवडणूकांची सध्या वेळ नाही. त्यामुळे कोणास विरोध करण्याची किंवा कोणाला पाठबळ देण्याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. कोणाचे कोणाशी राजकिय वैर असेल तर त्याच्याशी आपला सबंध न जोडण्याचे आवाहन आ. लंके यांनी केले आहे.

राजकारणाच्या वेळी राजकारण करण्यास आम्ही सक्षम आहोत. पक्षांतर्गत राजकारण आम्हाला मान्य नाही. ते यापूर्वीही कधी केले नाही व यापुढेही करणार नाही असेही आ. लंके यांनी स्पष्ट केले.