MLA Sangram Jagtap sends Rs 1 crore defamation notice to Kiran Kale

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :- काँग्रेसने केलेल्या आयटी पार्क पोलखोल प्रकरणाचे वातावरण अजूनही शांत व्हायला तयार नाही. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे अदखलपात्र विषय आहेत असे जाहीरपणे संबोधनाऱ्या राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांनी काळे यांना १ कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवून खासगीत मात्र गंभीर दखल घेतली आहे.

MLA Sangram Jagtap sends Rs 1 crore defamation notice to Kiran Kale

जगतापांच्या नोटीसला काळे यांनी ८ पानांचे जोरदार लेखी प्रत्युत्तर दिले आहे. त्याबाबतची माहिती किरण काळे यांनी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

२ सप्टेंबर रोजी काळे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आयटी पार्कची पाहणी करत पोलखोल केल्याचा दावा केला होता. त्याच रात्री उशिरा काळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता.राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्याठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी बसून होते. म्हणून खोटा गुन्हा दाखल झाला असा आरोप काळे यांनी यावेळी केला होता. त्यानंतर ३ सप्टेंबरला काळे – जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोपांची राळ उठवीली होती.

जगताप यांनी काळे हे अदखलपात्र आहेत असे पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते. मात्र ॲड. किशोर देशपांडे यांच्या मार्फत जगताप यांनी काळे यांना आयटी पार्क प्रकरणावरून केलेले आरोप आपली बदनामी करण्याच्या हेतूने केले असल्याचे म्हणत १० दिवसांच्या आत १ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९ या खात्यात भरून त्याची पावती त्यांना पाठवण्याची नोटीस पाठवली आहे. नुकसान भरपाई न दिल्यास भा.द.वि. कलम ४९९ व ५०० अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नोटीस द्वारे कळविले आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना किरण काळे म्हणाले की, मला नोटीस प्राप्त झाली असून त्याला मी कायदेशीररित्या लेखी उत्तर दिले आहे. एखाद्या गोष्टीतील सत्य मांडणे म्हणजे एखाद्याची बदनामी करणे असे म्हणणे चुकीचे आहे. तथाकथित आयटी पार्कची काँग्रेसच्या पथकाने स्वतः पाहणी केली असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण आमच्याकडे उपलब्ध आहे. ते नगरकरांसमोर आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दाखविले आहे.

मात्र यामुळे माझे विरोधक प्रचंड अस्वस्थ झाले असून माझ्यावर एका मागे एक गुन्हे दाखल करणे, खटले दाखल करणे याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. आकसापोटी माझ्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या विनयभंगाच्या गुन्ह्याचा खरा तपास होऊन लवकरच सत्य समोर येईल. ‘कर नाही तर डर कशाला’. त्यामुळे मी त्याची पर्वा करत नाही. माझ्या अंगावर आलेल्यांना नगरकरांच्या हितासाठी शिंगावर घेत चारीमुंड्या कसे चीत करायचे हे मला माहित आहे. घाबरणे हे माझ्या रक्तात नसून छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे अपप्रवृत्तींच्या विरोधात लढत राहणे हे मला माहित आहे.

मी त्यांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, आपण माझ्यासह नगर शहरातील डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, वकील तसेच आयटी डिग्री असणाऱ्या तरुणांच्या संयुक्त पथकाच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधींसमवेत फेसबुक लाईव्हद्वारे आपण दावा करत असलेल्या तथाकथित आयटी पार्कची पाहणी करू. त्यासाठी मी त्यांची अपॉइंटमेंट शहराची लोकप्रतिनिधी या नात्याने मागितली आहे.

थोडीतरी नैतिकता शिल्लक असेल तर माझे आव्हान स्वीकारावे आणि लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी दावा केल्याप्रमाणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या सह उभारलेला तथाकथित आयटी पार्क नगरकरांना दाखवावा. त्यांनी कागदपत्र, पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावे. मी देखील पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवायला तयार आहे. खोटे बोलणे माझ्या रक्तात नाही. मी खोटं बोललो असेल तर त्यांची विशाल गणपतीसमोर माफी मागेन. पण ते नगरकरांशी खोटे बोलले असतील हे मी पुन्हा एकदा सिद्ध केले तर जाहीरपणे माफी मागण्याची त्यांची तयारी आहे का ? असा सवाल काळे यांनी केला आहे.

काळे म्हणाले की, मी कोणाची बदनामी केली नाही. ते कोण आणि काय आहेत ते सर्व नगरकरांना माहिती आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये काडीमात्रही द्वेष नसून नगरकरांच्या जनहितार्थ मी आवाज उठण्याचे काम केले आहे. मात्र माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये पराकोटीचा व्यक्ती द्वेष आहे असे वाटते. त्यांना न्यायालयात खटला दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहेत. विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्या प्रमाणे याही अग्निपरीक्षेला सामोरे जाण्यासाठी मी पूर्ण सज्ज आहे. खटल्यामध्ये मे.न्यायालया समोर मी स्वतः माझी व नगरकरांची बाजू मांडणार आहे.

काळे पुढे म्हणाले की, त्यांना झोपेत सुद्धा आजकाल माझाच चेहरा दिसतो. माझ्या सारख्या सामान्य तरुणाचा एवढा धसका त्यांनी घेणे बरे नाही. मला एका बाजूला अदखलपात्र म्हणतात आणि अंधारामध्ये मात्र १ कोटी रुपयांची दखल घेतात. काँग्रेस आणि नगरकरांना नगर शहरामध्ये पडलेल्या हजारो खड्ड्यांमधून मार्ग कसा काढायचा याची भ्रांत पडली आहे. यांना मात्र किरण काळेचा आवाज कसा दडपता येईल याची भ्रांत पडली आहे.

माझी १ कोटीची दखल घेणाऱ्या ज्या आमदारांना शहरात पडलेल्या १ लाख खड्ड्यांची दखल घेता येत नाही असे लोक माझ्यासाठी अदखलपात्र आहेतच, मात्र नगरकरांसाठी देखील ते अदखलपात्र आहेत. नगरकरांना खड्ड्यात ढकलणाऱ्या अशा बेजबाबदार लोकप्रतिनिधींना नगरकरंच पुढील विधानसभा निवडणुकीत बेदखल करतील. नोटीस उत्तराचा रु. १५ हजार खर्च काळे यांनी जगताप यांच्यावर ठेवला असून सदर रक्कम आपल्या रोख स्वरुपात न देता आमदारांच्या आयुर्वेद कार्यालय जवळ असणार्‍या असंख्य खड्ड्यांपैकी काही खड्डे शास्त्रशुद्ध पद्धतीने बुजवावेत असा सल्ला काळेंनी दिला आहे.

नोटीसीला प्रत्युत्तर देताना काळे यांनी अनेक महत्वपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे. केडगाव हत्याकांड प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेल्या घटनेमुळे नगर शहराची बदनामी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. जशी माझी दखल घेतली तशी केडगाव हत्याकांडामधील फरार असणाऱ्या एका महिला आरोपीच्या अटकेसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठपुरावा करण्याची दखल शहराचे लोकप्रतिनिधी घेणार काय असा खोचक सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रिडा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विशाल घोलप, शहर जिल्हा सरचिटणीस इम्रान बागवान, विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुजीत जगताप, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष योगेश दिवाणे, योगेश जयस्वाल आदी उपस्थित होते.