केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून समाजातील दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी अनेक योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यापासून तर अनेक जीवनावश्यक गोष्टींसाठी अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत केली जाते.
तसेच कोणताही नागरिक घराशिवाय राहू नये व प्रत्येकाला स्वतःची हक्काचे पक्के घर मिळावे या दृष्टिकोनातून देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना कार्यान्वित असून केंद्र सरकारची पीएम आवास योजना यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
परंतु यामध्ये जर आपण राज्य शासनाच्या दृष्टिकोनातून बघितले तर राज्य शासनाची रमाई आवास घरकुल योजना देखील एक महत्त्वाची योजना असून ही योजना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी प्रामुख्याने राबविण्यात येते. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून अशा नागरिकांचे स्वतःच्या पक्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते.
कसे आहे रमाई आवास योजनेचे स्वरूप?
समाजातील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान सुधारावे व त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता ग्रामीण आणि शहरी भागामध्ये या नागरिकांच्या स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घराच्या ठिकाणी पक्के घर बांधण्याकरिता सन 2018 पासून रमाई आवास घरकुल योजना राबवण्यात येते.
या योजनेअंतर्गत जर लाभ घ्यायचा असेल तर संबंधित लाभार्थ्याचे उत्पन्न मर्यादा ही ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक लाख रुपये आहे. तर शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी तीन लाख रुपये उत्पन्न मर्यादा आहे.
रमाई आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी प्रती घरकुल( शौचालय बांधण्यासहित) एक लाख बत्तीस हजार रुपये तर शहरी भागात प्रति घरकुल 2 लाख 50 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.
जर आपण 2024-25 या आर्थिक वर्षाचा विचार केला तर रमाई आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात 75, नगरपालिका क्षेत्राकरिता 93 तर नगरपंचायत क्षेत्रासाठी 14 व ग्रामीण क्षेत्रासाठी 697 घरांचे उद्दिष्ट मंजूर करण्यात आलेले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे करावा अर्ज?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शहरी भागातील लाभार्थी संबंधित महानगरपालिका कार्यालय किंवा नगरपरिषद किंवा नगरपंचायत कार्यालयामध्ये किंवा ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थी हे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालय त्यांच्याकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.