Property Loan:- जेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते तेव्हा बरेच जण कर्जाचा पर्याय अवलंबतात. कारण आवश्यक असलेला पैसा आपल्याकडे असेलच असे होत नाही. त्यामुळे पैशांची आपत्कालीन गरज भागवण्यासाठी कर्जाचा पर्याय निवडला जातो. यात मोठ्या प्रमाणावर पर्सनल लोन घेण्याकडे लोकांचा ट्रेंड आपल्याला दिसून येतो.
परंतु प्रत्येकच व्यक्तीला पर्सनल लोन घेता येत नाही. कारण पर्सनल लोन घेण्यासाठी तुमच्याकडे नोकरी असणे गरजेचे असते. अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे नोकरी नसेल आणि तुम्हाला जर कर्ज घ्यायचे असेल तर बँक जास्त व्याजदराने कर्ज देतात.
त्यामुळे तुम्ही प्रॉपर्टी लोनचा ऑप्शन निवडू शकतात. आपल्याला माहित आहे की, प्रॉपर्टी लोन मध्ये तुम्हाला घर किंवा दुकान यासारखी मालमत्ता तारण म्हणून द्यावी लागते व त्यावर तुम्हाला बँक कर्ज देत असते.
परंतु अशा प्रकारचे कर्ज घेणे जरा जखमीचे असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण हे कर्ज तुम्ही कष्टाने कमावलेल्या प्रॉपर्टीशी संबंधित असल्यामुळे प्रॉपर्टी लोन घेण्याअगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे असते.
घर किंवा दुकान गहाण ठेवून प्रॉपर्टी लोन घेणे अगोदर या गोष्टी जाणून घ्या
1- तुम्हाला कर्जाची गरज का आहे हे आधी समजून घ्या- तुम्हाला जर मालमत्तेवर कर्ज म्हणजेच प्रॉपर्टी लोन घ्यायचे असेल तर त्या अगोदर तुम्ही तुमच्या कर्जाच्या गरजेचा विचार केला पाहिजे.
कर्ज घेण्या अगोदर कर्जाचा तुमच्या परिस्थितीवर सकारात्मक परिणाम होईल की नाही याची खात्री करावी. जेव्हा तुम्ही व्यवसायासाठी कर्ज घेत असाल तेव्हा हा विचार करणे खूप गरजेचे आहे. तुमची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊनच कर्ज घ्यावे.
2- प्रॉपर्टी लोन फेडले नाही तर काय होते?- प्रॉपर्टी लोन हे सुरक्षित कर्जामध्ये येते. कारण हे कर्ज घेताना तुम्ही तुमची मालमत्ता तारण म्हणून दिलेली असते. त्यामुळे तुम्ही या कर्जाची परतफेड करू शकत नसाल तर तुमची मालमत्ता तुमच्या हातातून जाऊ शकते.
जरी तुमची मालमत्ता तारण देऊन हे सुरक्षित प्रकारचे कर्ज तुम्ही घेतले असेल तर ते कमी व्याजदराने मिळते. परंतु ते नियमितपणे परतफेड करणे खूप गरजेचे असते.
3- प्रॉपर्टी लोन वर आकारण्यात येणारे शुल्क तपासणे- प्रॉपर्टी लोनवर अनेक प्रकारचे चार्जेस असतात. त्यामुळे प्रॉपर्टी लोन घेण्याअगोदर या सर्व शुल्कांची माहिती घेणे फायद्याचे ठरते. प्रॉपर्टी लोन घेताना त्यावर प्रक्रिया शुल्क, संबंधित प्रॉपर्टीच्या मूल्याच्या मूल्यांकनासाठी मूल्यांकन शुल्क,
आवश्यक कागदपत्रांसाठी कायदेशीर खर्च आणि पडताळणी यासारखे शुल्क यामध्ये आकारले जाते. इतकेच नाही तर त्यामध्ये कायदेशीर कागदपत्रांवर सरकारच्या माध्यमातून लावण्यात येणारे मुद्रांक शुल्क,
प्रॉपर्टीच्या रेकॉर्डिंगसाठी लागणारी नोंदणी शुल्क आणि गहाणखत यांच्या कर्जाचा देखील यामध्ये समावेश होतो. त्यामुळे प्रॉपर्टी लोन घेण्याअगोदर या खर्चाचा देखील पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा.
4- प्रॉपर्टीचे मूल्यांकन- बँक तुम्हाला प्रॉपर्टीच्या मूल्यांकनाच्या आधारे कर्ज देत असते. कालांतराने मालमत्तेच्या किमतीमध्ये घट झाली असेल तर त्यामुळे नकारात्मक इक्विटी होऊ शकते आणि कर्ज घेणाऱ्याला मालमत्तेच्या सध्याच्या किमतीपेक्षा जास्त पैसे बँकेला द्यावे लागू शकतात किंवा द्यावे लागतात.
त्यामुळे या चार गोष्टींचा सांगोपांग विचार करूनच प्रॉपर्टी लोन घेण्याविषयीचा विचार करावा.