Business Success Story:- आज आपण जे काही उद्योग समूह पाहतो किंवा यशस्वी उद्योजक पाहतो ते एका रात्रीत यशाच्या शिखरावर पोहोचलेले नाहीत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खडतर तपश्चर्या करावी लागली आहे व तेव्हा कुठे त्यांना हे यश मिळाले आहे.
कारण कुठल्याही गोष्टींमध्ये तुम्हाला यश हवे असेल तर ते लागलीच आपल्याला मिळत नाही. त्याकरिता तुम्हाला प्रचंड प्रमाणात कष्ट, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांमध्ये सातत्य, काहीही परिस्थिती आली तरी मी माझे ध्येय पूर्ण करणारच अशा पद्धतीची जबर इच्छाशक्ती आणि महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला अपयश आले तरी न खचता अभ्यासू आणि खिलाडू वृत्तीने त्यावर केलेली मात इत्यादी गुण खूप आवश्यक असतात.
अशा सगळ्या या परिस्थितीमधून जात व्यक्तीला यशाचे गोड फळ चाखायला मिळते. अशीच काहीशी कहाणी आपल्याला चंदूभाई विराणी यांची सांगता येईल. चंदूभाई वीरानी हे नाव जर आपण कोणाला सांगितले तर बरेचजण त्यांना ओळखू शकणार नाहीत.
परंतु जर बालाजी वेफर्स हे नाव सांगितले तर प्रत्येक जण ओळखते. या बालाजी वेफर्सच्या यशामागे जर कोणाचा हात असेल तर तो चंदूभाई विरानी यांचा आहे. त्यांनीच खडतर मेहनतीने बालाजी वेफर्सची सुरुवात केली आणि आज हा व्यवसाय हजारो कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
चंदूभाई वीरानी आहेत बालाजी वेफर्सचे मालक
जर आपण चंदूभाई यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचा जन्म 31 जानेवारी 1957 यावर्षी गुजरात राज्याच्या जामनगर मधील एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला. आर्थिक परिस्थिती हालाखीचे असल्यामुळे त्यांचे कुटुंब उदरनिर्वाहाच्या शोधात धुंडोराजी येथे गेले.
तेव्हा चंदूभाईंचे वय अवघे पंधरा वर्षे होते. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना शिक्षण देखील पुरेसे करता आले नाही व त्यांनी कशीबशी दहावी इयत्ता उत्तीर्ण केली. या कालावधीमध्ये त्यांचे वडील जे काही कमवत होते त्यावरच त्यांचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता.
मग पुढे चालून चंदूभाई आणि त्यांचा भाऊ यांनी दोघांनी शेतीला आवश्यक असलेली उपकरणे व उत्पादनाची विक्री व्यवसायामध्ये उतरायचे ठरवले व व्यवसायाला सुरुवात देखील केली.
याकरिता चंदूभाईंना त्यांच्या वडिलांनी 20 हजार रुपयांची मदत केलेली होती. परंतु नियतीच्या मनामध्ये वेगळेच काही होते व त्यांचा हा व्यवसाय दोनच वर्षांमध्ये बंद पडला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आर्थिक अडचणी मध्ये आले.
उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम करण्याची वेळ आली
शेती उपकरणांच्या संबंधित असलेला व्यवसाय बंद पडल्यानंतर मात्र उदरनिर्वाह करता चंदूभाई आणि त्यांच्या भावाने एका सिनेमा थेटरच्या रेस्टॉरंटमध्ये काम करायला सुरुवात केली. या कामासोबतच त्यांनी सिनेमाची पोस्टर्स लावण्याचे कामे देखील केली.
परंतु या ठिकाणी काम करत असताना मात्र त्यांच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला व त्यांना या सिनेमागृहामध्ये काम करत असताना या रेस्टॉरंट मध्ये एक हजार रुपये प्रति महिना दराने कॉन्ट्रॅक्ट मिळाले व तेथून खरी सुरुवात झाली.
जेव्हा चंदूभाई आणि त्यांचे भाऊ या सिनेमागृहाच्या उपाहारगृहामध्ये काम करत होते तेव्हा त्यांना चिप्स आणि स्नॅक्सला असलेली मागणी दिसून आली व त्यानंतर त्यांनी स्वतःची चिप्स तयार करायला सुरुवात केली. हे करत असताना त्यांनी चिप्स चवदार लागावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करायला सुरुवात केली व चिप्स निर्मिती उद्योग उभारण्यासाठी पुन्हा एकदा दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली.
या गुंतवणुकीतून त्यांनी चिप्स उद्योगाला सुरुवात केली व तयार केलेले चिप्स ते काम करत असलेले सिनेमागृह व आजूबाजूच्या परिसरामध्ये विक्री करायला देखील सुरुवात केली. या चिप्सला ग्राहकांनी देखील चांगली पसंती देऊन प्रतिसाद देखील दिला व बघता बघता हा व्यवसाय वाढायला लागला.
मग पुढे चंदूभाई यांनी राजकोटमध्ये बटाटा वेफर्स तयार करणाऱ्या कंपनीची सुरुवात केली व बँकेच्या माध्यमातून 50 लाख रुपयांचे कर्ज घेऊन 1992 मध्ये चंदूभाई व त्यांचे भाऊ मिळून दोघांनी बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनीला सुरुवात केली
जर आपण या बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा अवाका पाहिला तर संपूर्ण देशामध्ये पाच हजार कर्मचारी काम करत असून जवळपास 50 टक्के महिला कर्मचारी आहेत. या कंपनीचे गुजरातमध्ये राजकोट आणि वळसद या दोन ठिकाणी युनिट असून यामधून प्रतितास 3400 किलो चिप्सची निर्मिती केली जाते.
अशाप्रकारे चंदूभाईंनी कष्ट तसेच अपयश आल्यानंतर हार न मानता जिद्दीने प्रवास चालू ठेवला व आज त्यांच्या या कंपनीचे बाजार म्हणले तब्बल 4000 कोटी रुपये आहे. म्हणजेच अगदी शून्यातून सुरुवात करणारे चंदूभाई विराणी हे आज 4000 कोटी रुपयांचे मालक आहे.