Education Loan:- आजकालच्या परिस्थितीमध्ये उच्च शिक्षण घेणे हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. कारण आजकालचे उच्च शिक्षणाचे जर शुल्क पाहिले तर ते काही लाखो रुपयांमध्ये असल्यामुळे उपलब्ध उत्पन्नामधून इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा खर्च करणे प्रत्येक पालकाला शक्य होत नसते.
त्यामुळे अनेक विद्यार्थी हुशार असून देखील त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. परंतु यामध्ये एज्युकेशन लोन म्हणजे शैक्षणिक कर्जाचा एक पर्याय आपल्यासमोर असतो.
त्याकरिता बरेच विद्यार्थी हे शैक्षणिक कर्ज म्हणजेच एज्युकेशन लोन घेतात व पुढील आपल्या शिक्षणाचा मार्ग सुकर करत असतात. परंतु कर्ज घेतले म्हणजे त्याची परतफेड करणे हे क्रमप्राप्त येतेच. ज्याप्रमाणे इतर कुठल्याही कर्ज घेऊन आपल्याला त्याची परतफेड करावी लागते
अगदी त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्जाची देखील परतफेड करावी लागते. याकरता आपला खर्च व पैशांची बचत यांची योग्य सांगड घालणे गरजेचे असते व तेव्हाच आपण अशा कर्जाचे हप्ते भरू शकतो. नाहीतर मात्र मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
या परिस्थितीत जर तुमच्या घरात तुमच्या पाल्यांनी देखील जर एज्युकेशन लोन म्हणजे शैक्षणिक कर्ज घेतलेले असेल तर त्याची परतफेड करण्याला प्राधान्य क्रम देणे खूप गरजेचे असते. नाहीतर काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्याकरिता या लेखामध्ये जर आपण शैक्षणिक कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही तर कुठल्या समस्या निर्माण होऊ शकतात? याबाबतची माहिती बघू.
शैक्षणिक कर्जाची वेळेवर परतफेड केली नाही तर काय होते?
1- लेट फी म्हणजेच विलंब शुल्क आणि अतिरिक्त व्याज लागते– तुम्ही एज्युकेशन लोन घेतली आहे व त्याचे काही हप्ते भरले व काही भरताना तुम्हाला अडचणी आल्या व तुम्ही कर्जाचे हप्ते भरले नाही तर बँकेकडून तुम्हाला याबाबत विचारणा केली जाते. परंतु तुम्ही जर उशिराने हप्ते भरले तर यावर तुम्हाला लेट फी म्हणजेच विलंब शुल्क बँकेकडून आकारले जाते.
इतकेच नाही तर हप्ते भरायला जितके दिवस तुम्ही वेळ कराल तितके त्यावर अतिरिक्त व्याज आकारले जाते. समजा तुम्ही शैक्षणिक कर्ज भरायला 180 दिवसांपेक्षा जास्त वेळ लावला तर मात्र बँक कायदेशीर मार्गांचा वापर करू शकतो.
2- क्रेडिट स्कोरवर परिणाम– शैक्षणिक कर्ज असो किंवा होमलोन किंवा कोणत्याही कर्जाची परतफेड जर वेळेवर केली नाही तर त्याचा सगळ्यात वाईट परिणाम हा आपल्या सिबिल स्कोरवर दिसून येतो.
त्याचप्रमाणे तुम्ही एज्युकेशन लोन जर वेळेवर भरले नाही तर त्याचा परिणाम क्रेडिट स्कोरवर होऊन तो कमी होतो. तसेच तुम्ही अनेक हप्ते भरले नाहीत तर तुम्हाला डिफॉल्टर म्हणून घोषित केले जाते व सिबिलच्या डिफॉल्टर यादीमध्ये तुमचे नाव समाविष्ट केले जाते.
3- कायदेशीर नोटीस– कर्जाचे काही हप्ते चुकवल्यानंतर बँक सर्वात प्रथम कर्जदाराला त्यासंबंधीची कायदेशीर नोटीस पाठवते. जर तरी देखील कर्ज वेळेवर फेडले गेले नाही तर हमीदराला देखील कायदेशीर नोटीस बँकेकडून दिली जाते.अशा प्रकारामध्ये जो तुमचा गॅरेंटर असतो त्याच्या विश्वासार्थेवर देखील परिणाम होतो. गॅरेंटरचा देखील क्रेडिट स्कोर कमी होऊ शकतो.
4- मालमत्ता जप्त होऊ शकते– बँकेकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी नोटीस बजावली जाते व तरीदेखील कर्ज न फेडल्यास कर्जदार डिफॉल्टर घोषित केले जाते व जर कर्ज घेताना कुठली मालमत्ता तारण दिलेली असेल तर ती जप्त देखील केली जाऊ शकते. जप्त झालेल्या मालमत्त्यांचा लिलाव करून बँक पैशांची वसुली करू शकते.
त्यामुळे अशा समस्यांपासून वाचायचे असेल तर शैक्षणिक कर्जाची परतफेड करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. समजा यामध्ये तुम्हाला कर्जाच्या हप्त्यांचे रक्कम भरणे शक्य नसेल तर बँकेकडून तुम्ही हप्त्याची रक्कम कमी करण्याची विनंती करून रक्कम कमी करू शकतात. मात्र हप्त्याची रक्कम जर कमी झाली तर मात्र कर्ज परतफेडीचा कालावधी वाढतो.