Fixed Deposit:- गुंतवणूक ही एक महत्त्वाची संकल्पना असून गुंतवणुकीचा तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होत असतो. कारण तुम्ही किती पैसा कमावता यापेक्षा तुम्ही कमावलेला पैसा कशा पद्धतीने बचत करता व कुठे गुंतवतात याला अतिशय महत्त्व असते. तुम्ही कमावलेला पैशांची बचत करून जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली नाही तर तुम्ही कितीही पैसा कमावला तरी देखील त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही.
त्यामुळे गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. गुंतवणूक करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेले पर्याय पाहिले तर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार हे म्युच्युअल फंड एसआयपी, सरकारच्या अल्पबचत योजना, शेअर मार्केट आणि विविध बँकांच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य देतात. कारण गुंतवणूक करताना गुंतवणुकीपासून आपल्याला परतावा चांगला मिळेल व गुंतवणूक देखील सुरक्षित राहील हा एक महत्त्वाचा उद्देश प्रत्येक गुंतवणूकदाराचा असतो.
या अनुषंगाने जर आपण या गुंतवणूक पर्यायांचा तुलनात्मक दृष्टीने अभ्यास केला तर यामध्ये फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव योजनेमध्ये केलेली गुंतवणूक ही फायद्याचे ठरते व प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव अर्थात फिक्स डिपॉझिट मधील गुंतवणूक ही फायद्याची मानली जाते.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच वाराणसी मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व या अर्ज दाखल करतेवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली व विशेष म्हणजे त्यांच्याकडील जी काही संपत्ती आहे त्यापैकी 95 टक्के गुंतवणूक त्यांनी फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेवींमध्ये केली आहे. या अनुषंगाने आपण या लेखात मुदत ठेवीमधील गुंतवणूक का फायद्याचे ठरते हे बघू.
फिक्स डिपॉझिट गुंतवणुकीसाठी आहे उत्तम पर्याय
फिक्स डिपॉझिट हा गुंतवणुकीसाठी सर्वात विश्वसनीय असा पर्याय म्हणून ओळखला जातो. खासकरून ज्येष्ठ नागरिकांकरिता चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून याकडे पाहिले जाते. देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या एकूण संपत्तीपैकी 95% संपत्ती मुदत ठेवींमध्ये ठेवल्यामुळे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून फिक्स डिपॉझिटचे महत्व आपल्याला कळते.
तसेच फिक्स डिपॉझिट चे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सातत्यपूर्ण उत्पन्न मिळतेच आणि बाजारातील जे काही चढ-उतार असतात त्यापासून देखील संरक्षण होत असते. तसेच फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून बऱ्याच जणांना विश्वासार्ह परतावा आणि आर्थिक स्थिरता हवी असते व अशा प्रकारची आर्थिक स्थिरता आयुष्याच्या निवृत्तीच्या कालावधीत खूप महत्त्वाची असते व त्या दृष्टिकोनातून फिक्स डिपॉझिटमधील गुंतवणुकीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
यामध्ये स्थिर मुदत ठेवी आणि स्थिर व्याजदरांसह मुदत ठेवी संपूर्ण गुंतवणुकीच्या कालावधीत अंदाजे असतात व त्यामुळे त्याच्या अंदाजानुसार गुंतवणूकदारांना त्यांच्या भविष्यकालीन विविध आर्थिक उद्दिष्टांसाठी योजना आखणे शक्य होते. कारण गुंतवणूकदारांना त्यांना किती रक्कम मिळेल? याचे अचूक गणित लावता येते.
तसेच फिक्स डिपॉझिट चे खाते उघडणे आणि ते व्यवस्थापित करणे हे सहज शक्य आहे. विशेष म्हणजे फिक्स डिपॉझिट वर गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर फीक्स डिपॉझिटमधील गुंतवणूक उच्च व्याजदरांसह ज्येष्ठ नागरिकांना बरेच विशेष फायदे देते.
नरेंद्र मोदींनी एफडीमध्ये गुंतवली आहे 95 टक्के संपत्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला व या अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून बघितले तर त्यांची एकूण संपत्ती 3.02 कोटी असून त्यांच्याकडे 52 हजार 920 रुपयांची रोकड रक्कम असल्याचे आपल्याला प्रतिज्ञापत्राद्वारे दिसून येते.
परंतु विशेष म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीपैकी तब्बल 95 टक्के गुंतवणूक त्यांनी एफडीमध्ये केलेली आहे. सरकारच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये त्यांनी 9.12 लाख रुपये गुंतवले असून त्यांच्या एकूण 3.02 कोटी रुपयांच्या वैयक्तिक संपत्ती मधून 2.86 कोटी म्हणजेच एकूण 95 टक्के संपत्ती मुदत ठेवींमध्ये गुंतवली आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार बघितले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुंतवणूक स्टॉक, बॉण्ड किंवा म्युच्युअल फंडामध्ये करण्यात आलेली नाही. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवीमध्ये 2.86 कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे.