Floriculture Farming :- अगोदर परंपरागत शेतीमध्ये भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर केली जायची. परंतु भाजीपाला लागवड करत असताना ती प्रामुख्याने मोकळ्या शेतामध्ये केली जायची. अजूनदेखील आपण पाहतो तर भाजीपाला शेती मोठ्या प्रमाणावर मोकळ्या शेतातच केली जाते. पण तो आता शेडनेट सारखे प्रगत तंत्रज्ञान आल्यामुळे भाजीपाला लागवड आता शेडनेटच्या माध्यमातून करण्यात येत असून कमीत कमी क्षेत्रामध्ये खूप जास्त पद्धतीचे उत्पादन मिळवण्यात शेतकरी यशस्वी होत आहेत.
अगदी त्याच पद्धतीने फुलशेतीचे सुद्धा उदाहरण सांगता येईल. फुलशेती देखील आता शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून केली जात असून खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन शेतकरी घेत आहेत. शेडनेटमध्ये फुलशेतीत पुणे जिल्हा आघाडीवर आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
वेगवेगळ्या प्रकारच्या फुल पिकांची लागवड पुणे जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत. याचा अनुषंगाने जर आपण पुरंदर तालुक्यातील चांबळी या गावच्या मोहन कामठे या शेतकऱ्याचा विचार केला तर यांनी शेडनेटचा वापर न करता देखील सोनचाफा पिकाची लागवड केली व अर्धा एकर क्षेत्रामध्ये तब्बल अडीच ते पावणे तीन लाख रुपयांचा नफा त्यांनी मिळवला आहे. त्यांचीच यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.
सोनचाफा लागवडीतून या शेतकऱ्याने वार्षिक मिळवला अडीच ते तीन लाखाचा नफा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चांबळी हे पुरंदर तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील गाव असून या ठिकाणच्या मोहन कामठे यांनी अर्धा एकरमध्ये सोनचाफा लागवड केली व त्यामधून वार्षिक ते अडीच ते पावणे तीन लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत. गेल्या चार वर्षापासून ते यामधून सातत्याने उत्पादन घेत असून पुणे शहरातील गुलटेकडी येथील बाजारपेठेतच त्याची ते विक्री करत आहेत. जर आपण मोहन कामठे यांचा विचार केला तर अगोदर ते पारंपारिक पद्धतीने शेती करत होते.
पण बऱ्याचदा खर्च जास्त आणि उत्पादन कमी या समस्येला त्यांना तोंड द्यायला लागत होते. त्यांच्या मनामध्ये कायमच विचार चालायचे की शेतीमध्ये काहीतरी नवीन करावे व चांगले उत्पादन मिळवावे. या पद्धतीनेच ते प्रयत्न करत असताना एकदा त्यांच्या मामाच्या गावाला गेले असता त्यांनी त्या ठिकाणी सोनचाफा लागवड पाहिली. लागलीच त्यांनी संबंधित शेतकऱ्याकडून सोनचाफा शेती विषयी संपूर्ण माहिती घेतली व स्वतःच्या शेतात सोनचाफा लागवड करण्याचे निश्चित केले.
याकरिता त्यांनी रत्नागिरी या ठिकाणाहून सोनचाफ्याची रोपे आणली व अर्धा एकर क्षेत्रामध्ये सोनचाफ्याची लागवड केली. घेतलेल्या माहितीनुसार त्यांनी संपूर्णपणे व्यवस्थापन केले व आज त्यांच्या कष्टाला फळ मिळाले असून याच सोनचाफा शेतीतून त्यांना अडीच ते तीन लाखांचे उत्पादन मिळत आहे. परंपरागत पिकाचा आणि शेतीपद्धतीला रामराम करत सोनचाफ्यासारख्या फुल पिकाची लागवड यशस्वी केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून देखील त्यांचे कौतुक केले जात आहे.
फुलांच्या तोडणीचे नियोजन कसे करतात?
सोनचाफ्याच्या फुलाचा उपयोग पाहिला तर तो अनेक ठिकाणी केला जातो त्यामुळे याला मागणी चांगली असते. पक्व झालेल्या फुलाची तोडणी करताना ती फक्त सकाळच्या वेळीच करणे गरजेचे असते व ही फुले तोडणी केल्यानंतर एका प्लास्टिकच्या बॅगेमध्ये ते दहा फुलांचे नग प्रती बॅग या पद्धतीने भरले जातात.
याकरिता मजुरांची आवश्यकता भासते. परंतु कामठे यांच्या घरातील सदस्य त्यांना यासाठी खूप मोठी मदत करतात. चार वर्षापासून सोनचाफा उत्पादनातून त्यांना खूप चांगला प्रकारे नफा मिळत आहे. पाहायला गेले तर पुणे जिल्ह्यातील शेतकरी हे कायमच नवनवीन प्रयोग करत असतात. परंतु मोहन कामठे यांचा आगळावेगळा सोनचाफा शेतीचा प्रयोग खूपच यशस्वी ठरल्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे.
अर्धा एकर मधील हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता अजून क्षेत्र वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. अशापद्धतीने मोहन कामठे यांच्या उदाहरणावरून दिसून येते की परंपरागत पिकपद्धती सोडून काहीतरी वेगळे केले व त्याला कष्टाची जोड दिली तर नक्कीच शेतीत देखील चांगले उत्पादन मिळू शकते हे सिद्ध होते.