Government Investment Scheme:- गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय सध्या उपलब्ध असल्यामुळे गुंतवणूकदार वेगवेगळ्या पर्यायांमध्ये पैसे गुंतवतात. पैसे गुंतवताना मात्र पैशांची सुरक्षितता आणि मिळणारा परतावा इत्यादी महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करून त्यानंतर गुंतवणुकीसाठी पर्याय निवडले जातात.
सध्या जर आपण बघितले तर बँकांच्या मुदत ठेव योजना तसेच म्युच्युअल फंड एसआयपी, सोने चांदीची खरेदी व जोखीम घ्यायची तयारी असेल तर शेअर मार्केट इत्यादी मध्ये गुंतवणूक केली जाते. परंतु तुम्हाला जोखीम घ्यायची नसेल आणि परतावा देखील तुम्हाला उत्तम हवा असेल तर तुम्ही गुंतवणुकीसाठी सरकारी योजनांचा पर्याय निवडू शकतात.
यामध्ये काही सरकारी योजना या टॉपमध्ये असून यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर व्याजदर देखील चांगला आहे व काही कालावधीनंतर तुमची गुंतवणूक दुप्पट देखील होते. अशाच सरकारच्या टॉप पाच योजनांची माहिती आपण या लेखात थोडक्यात घेऊ.
गुंतवणुकीसाठी टॉप आहेत सरकारच्या या योजना
1- किसान विकास पत्र योजना- किसान विकास पत्र ही एक सरकारी बचत योजना असून या योजनेत जर गुंतवणूक केली तर सध्या 7.5% दराने व्याज दिले जात आहे. किसान विकास पत्र योजनेमध्ये केलेली गुंतवणूक नऊ वर्ष आणि पाच महिन्यात दुप्पट होते.
किसान विकास पत्र योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये तुम्ही कितीही पैसे गुंतवले तरी तुमचे पैसे नऊ वर्ष आणि पाच महिन्यानंतर दुप्पट होतात. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ही योजना फायद्याचे ठरते.
2- पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट- पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ज्या काही योजना राबवल्या जातात त्यामध्ये पोस्टाची टाईम डिपॉझिट योजना ही एक फायद्याची योजना आहे. ज्याप्रमाणे बँकांची एफडी योजना असते अगदी त्याचप्रमाणे पोस्ट ऑफिसची ही टाईम डिपॉझिट योजना ओळखली जाते.
तुम्हाला जर या योजनेत खाते उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकतात. पोस्ट ऑफिसच्या या टाईम डिपॉझिट योजनेमध्ये जर तुम्ही पाच वर्षाच्या मुदतीसाठी ठेव ठेवली तर त्यावर 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
3- नॅशनल सेविंग सर्टिफिकेट अर्थात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना- ही देखील सरकारी बचत योजना आहे व यामध्ये केलेली गुंतवणूक देखील खूप फायद्याचे ठरते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेचा परिपक्वता कालावधी पाच वर्षाचा असून सध्या या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर 7.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
विशेष म्हणजे या योजनेत जर गुंतवणूक केली तर आयकर कलम 80C अंतर्गत करात लाभ देखील मिळतो. त्यामुळे गुंतवणुकीसाठी ही योजना फायदेशीर ठरते.
4- ज्येष्ठ नागरिक बचत योजना- ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना खूप महत्त्वाची असून या योजनेमध्ये साठ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांना खाते उघडता येते.
या योजनेमध्ये नागरिकांना केलेल्या गुंतवणुकीवर 8.2 टक्के दराने व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेमध्ये कमाल 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते व ही योजना देखील पाच वर्षांसाठी चालते.
5- सुकन्या समृद्धी योजना- आपल्याला माहित आहे की मुलींच्या उज्वल आर्थिक भविष्यासाठी केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना अतिशय फायदेशीर अशी योजना आहे. या योजनेमध्ये दहा वर्षाखालील मुलींच्या नावाने खाते उघडले जाते.
एका वर्षामध्ये जास्तीत जास्त दीड लाख रुपयांची रक्कम या योजनेत जमा करता येते. मुलींसाठी ही योजना अतिशय फायद्याची असून या योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर केंद्र सरकार सध्या 8.2% टक्के दराने व्याज देत आहे.