Business Success Story:- व्यक्तीमध्ये जर कल्पनाशक्ती असली व कल्पनेला वास्तविकतेमध्ये उतरवण्याचा मूलभूत गुण जर असला तर व्यक्ती कुठल्याही कल्पनेतून स्वतःचे अफाट असे विश्व निर्माण करू शकतो. साहजिकच अशा कल्पना सत्यात उतरवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर मेहनत आणि प्रचंड प्रमाणात सातत्य ठेवून काम करावे लागते व आलेल्या अडचणींवर मात करत यशाचा मार्ग काढावा लागतो.
आपण जे काही विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तिमत्त्व बघतो तेव्हा त्यांच्या यशामागे नक्कीच त्यांचे अफाट कष्ट आणि प्रचंड प्रमाणात घेतलेली मेहनत असते. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण उद्योगपती पूनम गुप्ता यांची यशोगाथा बघितली तर ती उद्योग क्षेत्रात किंवा नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशी ठरेल.
पुनम गुप्ता यांनी रद्दी पेपर मधून स्वतःचा बिजनेस आज नावारुपाला आणला असून त्या माध्यमातून ते मोठ्या प्रमाणावर आर्थिक समृद्धी प्राप्त करताना दिसून येत आहेत.त्यांचीच प्रेरणादायी कथा आपण या लेखात बघणार आहोत.
पुनम गुप्ता यांची यशोगाथा
पुनम गुप्ता या मुळच्या दिल्लीच्या रहिवासी असून त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी बघितली तर त्यांनी लेडी श्रीराम कॉलेजमधून इकॉनॉमिक मध्ये ऑनर्स केले व त्यानंतर त्यांनी एमबीएला ऍडमिशन घेऊन एमबीए देखील पूर्ण केले.साहजिकच कोणत्याही विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षण घेतल्यानंतर अगोदर नोकरी शोधायचा प्रयत्न करतो व चांगली नोकरी मिळेल अशा प्रकारची अपेक्षा असते.
अगदी त्याच प्रकारे पूनम गुप्ता यांनी देखील नोकरी शोधायचा खूप प्रयत्न केला. परंतु एमबीए केल्यानंतर देखील त्यांना नोकरी मिळाली नाही.त्यानंतर 2002 यावर्षी त्यांचे लग्न पुनीत गुप्ता यांच्याशी झाले. पुनीत हे स्कॉटलंड येथे नोकरी करतात व त्यामुळे पुनम यांना देखील स्कॉटलंड येथे राहिला जावे लागले.
त्या ठिकाणी देखील त्यांनी नोकरी शोधण्यासाठी अनेक प्रयत्न केले व त्या ठिकाणी देखील त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या. एकदा अशाच नोकरीच्या शोधात असताना त्यांनी एका कार्यालयाला भेट दिली व त्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर रद्दीचे गठ्ठे त्यांना दिसून आले.
त्यानंतर त्यांनी यावर संशोधन सुरू केले व रद्दीपासून रिसायकलिंग करून काहीतरी नवीन तयार होऊ शकते का याची कल्पना त्यांच्या डोक्यात तरळली. या दरम्यान स्कॉटलंडच्या एका योजनेतून त्यांना एक लाख रुपयांचा फंड मिळाला व त्यानंतर त्यांनी नोकरी करण्यापेक्षा या क्षेत्रातच काहीतरी व्यवसाय सुरू करावा अशा प्रकारचा निर्णय घेतला.
लागलीच त्यांनी 2003 मध्ये पीजी पेपर नावाचा रद्दी रिसायकलिंग करणारा स्टार्टअप सुरू केला. या उद्योगांमध्ये ते रद्दी पेपर खरेदी करायचे व ते रिसायकल करून अधिक चांगल्या क्वालिटीचे पेपर बनवायला त्यांनी सुरुवात केली व आज त्यांचा हा व्यवसाय 800 कोटी रुपयांच्या घरात पोहोचलेला आहे.
सुरुवातीला त्यांचा पीजी पेपर या नावाचा स्टार्टअप अगदी स्थानिक पातळीवर होता. परंतु हळूहळू त्याची मागणी वाढल्यामुळे स्कॉटलंडमध्ये त्यांनी व्यवसायाचा विस्तार केला व त्यानंतर युरोप आणि अमेरिकेत देखील व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले व विस्तार केला.
आज संपूर्ण जगामध्ये 60 देशांमध्ये पीजी पेपर कंपनीचा विस्तार झालेला आहे. अशाप्रकारे रद्दीचा पेपर पाहून त्यांच्या डोक्यात कल्पना आली व त्यातूनच त्यांचा हा व्यवसाय उभा राहिला व आज कोट्यावधी रुपयांची कंपनी पुनम गुप्ता यांनी उभी केली. परंतु या यशामागे नक्कीच त्यांचे अफाट प्रयत्न तसेच प्रयत्नांमधील सातत्य व येणाऱ्या अडचणीवर मात करत हे यश मिळवले आहे हे मात्र नक्की.