Importance Tips For Increase Money:- पैशांच्या बाबतीत योग्य आर्थिक नियोजन करणे खूप गरजेचे असते. नाहीतर तुम्ही जर आर्थिक नियोजन केले नाही आणि कितीतरी पैसा कमावला तरी मात्र तुमच्या हातात पैसा शिल्लक राहत नाही हे तेवढेच सत्य आहे. त्यामुळे तुम्ही जो काही पैसा कमावतात त्या पैशांचे योग्य नियोजन करणे खूप गरजेचे असते.
आपण बरेच व्यक्ती बघतो की महिन्यामध्ये ते भरपूर पैसा कमावतात. परंतु त्यांच्या हातात पैसा शिल्लकच राहत नाही किंवा कायम त्यांना आर्थिक चणचण भासत राहते. या सगळ्या परिस्थितीला आर्थिक नियोजन नसणे किंवा आपल्या काही पैशांच्या संबंधितल्या चुकाच कारणीभूत ठरतात.
त्यामुळे तुम्ही जर अशा चुका करत असाल व त्यामुळे पैशांचे काही नुकसान होत असेल तर मात्र तुम्ही त्या चुका समजून त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.
त्यामुळे येणाऱ्या या 2025 या नवीन वर्षात संकल्प करावा की तुम्ही पैशांच्या संबंधित जर काही चुका करत असाल तर त्या सुधारून तुम्ही आर्थिक समृद्धीच्या दिशेने पावले टाकाल. जेणेकरून पैशांच्या संबंधित असलेली कमतरता तुम्हाला जाणवणार नाही.
पैशांच्या संबंधित या गोष्टी अगोदर समजा! कारण या ठिकाणी होतात प्रमुख चुका
1- गुंतवणुकीचे नियोजन याला आर्थिक नियोजन कधीच समजू नका- यामध्ये बरेच जण गुंतवणुकीचे नियोजन आणि आर्थिक नियोजन या दोन्ही गोष्टींना सारखेच मानतात. परंतु जर बघितले तर तुम्ही तुमची गुंतवणूक योजना बनवली असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही आर्थिक नियोजन केले आहे.
वास्तविक बघता गुंतवणुकीचे नियोजन हे आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे. परंतु आर्थिक नियोजनामध्ये पैशाशी संबंधित सर्व गोष्टींचा समावेश होतो. म्हणजेच तुम्ही आपत्कालीन निधी म्हणून जो पैसा जमा करत आहात तो पैसा तसेच विमा, पैशांचा रोख प्रवाह तसेच कर कार्यक्षमता, प्रॉपर्टीचे नियोजन इत्यादी गोष्टींना आर्थिक नियोजनाचा भाग समजले जाते.
परंतु गुंतवणुकीचे नियोजन जर बघितले तर यामध्ये केवळ पैशांच्या गुंतवणुकीशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यांचा समावेश होतो. त्यामुळे जर तुम्ही फक्त गुंतवणुकीचे नियोजन केले असेल तर तुम्हाला 2025 मध्ये आर्थिक नियोजनावर देखील लक्ष केंद्रित करावे लागेल. तरच तुम्ही गुंतवणुकीचे नियोजन करू शकाल. म्हणजेच तुम्ही एकूण आर्थिक नियोजन करून तो पैसा वाचवाल तो गुंतवणुकीसाठी वापरू शकाल असा त्याचा अर्थ होतो.
2- गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेऊ नका- बरेच जण स्टॉक मार्केट किंवा इतर गुंतवणूक पर्यायामध्ये पैसे गुंतवण्यासाठी पर्सनल लोन किंवा इतर स्वरूपाचे कर्ज घेतात व गुंतवणूक करतात. परंतु असे करणे योग्य नाही. जर तुम्ही कुठल्याही प्रकारची कर्ज घेतले तर त्यावर तुम्हाला व्याज द्यावे लागते.
कर्ज घेऊन केलेल्या पैशाच्या गुंतवणुकीवर परतावा कर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त असेल तर फायदा होतो. परंतु प्रत्येक गुंतवणुकीत आणि खासकरून शेअर्समधील गुंतवणुकीशी संबंधित अनेक जोखीम असतात.
अशा प्रसंगी जर तुम्ही कर्ज घेतले असेल आणि हे सगळे पैसे शेअर्समध्ये गुंतवले असतील व बाजार जर घसरला तर मात्र तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते व तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकतात.
3- विमा पॉलिसीला गुंतवणूक समजू नका- आपल्यापैकी बरेच जण विमा पॉलिसी घेतात व विमा पॉलिसीचा जर उद्देश बघितला तर तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक सुरक्षा मिळावी हा असतो. दुर्दैवाने जर कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या बाबतीत एखादी दुर्दैवी घटना घडल्यास विमा कंपनीकडून विमा कव्हर पोटी जो काही पैसा मिळतो तो कुटुंबाला आर्थिक आधार म्हणून वापरता येतो किंवा आर्थिक आधार त्या माध्यमातून मिळते.
तसेच तुम्ही आरोग्य विमा घेतला तर यामुळे तुम्हाला उपचारांवर झालेला खर्चाची भरपाई मिळते. परंतु बरेच जण विमा पॉलिसीमध्ये गुंतवणूक सातत्याने करत असतात.
परंतु विमा पॉलिसीमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला परतावा खूपच कमी मिळतो. संपत्ती वाढवण्यासाठी किंवा संपत्ती निर्मितीसाठी तुम्ही विमा उत्पादनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ती करू नका.
4- एकाच मालमत्तेत सगळे पैसे गुंतवू नका- बरेच जण संपूर्ण गुंतवणूक फक्त एका मालमत्तेमध्ये करतात. परंतु अशा प्रकारची गुंतवणूक ही धोकादायक ठरू शकते. गुंतवणूक तज्ञ सांगतात की, गुंतवणुकीमध्ये विविधता आणणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच तुम्ही तुमचे पैसे वेगवेगळ्या मालमत्ता मध्ये गुंतवणे गरजेचे आहे.
एकूण पैशांपैकी काही शेअर्समध्ये, काही पैसे म्युच्युअल फंडाच्या इक्विटी स्कीम मध्ये, काही पैसे सोन्यामध्ये अशाप्रकारे गुंतवणुकीत विविधता ठेवावी. म्हणजे एखाद्या मालमत्तेत घट झाल्याचा तुमच्या एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओवर विपरीत परिणाम होत नाही.
तसेच अशा प्रकारे जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवले तर प्रत्येक मालमत्ता ही वेगवेगळ्या वेळी वाढते आणि पडते. त्यामुळे तुमचे नुकसान होत नाही.
5- आपत्कालीन निधी तयारच ठेवा- आपत्कालीन निधी ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जर तुम्ही अजूनपर्यंत आपत्कालीन निधी तयार केला नसेल तर मात्र तो 2025 मध्ये तयार करणे सुरू करा. याकरिता तुम्ही छोट्या फंडातून सुरुवात करू शकता व हळूहळू निधी वाढवू शकतात.
आपत्कालीन निधीचा फायदा असा होतो की,अचानक जर कुठली समस्या उद्भवली तर तुम्हाला पैशांकरिता इतरांकडे हात पसरावे लागत नाही किंवा जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागत नाही. त्यामुळे आपत्कालीन निधी जमा करणे खूप गरजेचे आहे.