‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही उक्ती गुंतवणुकीच्या बाबतीत यथार्थपणे लागू होते. ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबा थेंबाने तळे साचू शकते. त्याचप्रमाणे तुमची छोट्या स्वरूपातली सातत्याने केलेली गुंतवणूक तुम्हाला लाखो रुपये देऊ शकते. गुंतवणूक करायची म्हणजे तुम्हाला लाखो रुपये लागतील असे काही नाही.
तुम्ही अगदी पाचशे रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात व काही वर्षांनी लाखो रुपयांचे मालक होऊ शकतात. अशा अनेक अल्पबचत योजना आहेत की ज्यामध्ये तुम्ही अगदी छोट्या स्वरूपात केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक स्वरूपामध्ये व्याज दिले जाते व यामाध्यमातून तुम्हाला चांगला परतावा मिळतो.
फक्त यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावे लागते की, तुम्ही एकदा गुंतवणुकीला सुरुवात केली की संबंधित गुंतवणूक योजनेचा कालावधी असेपर्यंत त्या गुंतवणुकीमध्ये सातत्य ठेवून गुंतवणूक करावी लागते.अशा प्रकारच्या अनेक सरकारी योजना असून त्यांना आपण अल्पबचत योजना असे देखील म्हणतो.
त्यामुळे या लेखात आपण अशा कोणत्या तीन योजना आहेत की ज्यामध्ये तुम्ही पाचशे रुपयांची प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करून पंधरा वर्षांनी लाखो रुपये मिळवू शकतात. बऱ्याचदा आपले उत्पन्न कमी असते व त्यावेळी तुम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकत नाही.
परंतु तुम्ही अगदी छोट्या स्वरूपामध्ये बचत करून गुंतवणुकीच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात करू शकतात. तसेच अशा प्रकारची छोटी गुंतवणुकीचे तुम्ही अनेक भागांमध्ये विभागणी करून गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळवू शकता.
छोट्या गुंतवणुकीतून लाखो रुपये मिळवून देतील या योजना
1- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ योजना– या सरकारी योजना असून छोट्या गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेमध्ये तुम्ही जे काही गुंतवणूक करतात त्यावर या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी 7.1% परतावा दिला जातो.
या गुंतवणूक योजनेमध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये जमा केले तर पंधरा वर्षांमध्ये तुमचा एकूण निधी एक लाख 63 हजार रुपये जमा होतो. पंधरा वर्षांमध्ये तुम्ही जर पाच वर्षांची वाढ केली म्हणजेच वीस वर्षापर्यंत गुंतवणूक करायचे ठरवले तर तुम्हाला या माध्यमातून दोन लाख 66 हजार रुपये मिळतात.
2- सुकन्या समृद्धी योजना– ही एक पोस्ट ऑफिसची योजना असून ती खास मुलींसाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही एका वर्षाला 250 रुपयापासून ते दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
समजा तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांची गुंतवणूक केली तर पंधरा वर्षात तुमचे 90 हजार रुपये जमा होतात. 15 ते 21 वर्ष दरम्यान तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करावी लागत नाही.
3- म्युच्युअल फंड एसआयपी– एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकतात. यामध्ये जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांची गुंतवणूक पंधरा वर्षापर्यंत केली तर बारा टक्के दराने तुम्हाला अडीच लाख रुपयांच्या जास्त निधी मिळतो व यामध्ये तुम्ही आणखी चार वर्षे वाट पाहिल्यास वीस वर्षात ही रक्कम पाच लाख रुपये होते.