SIP vs RD:- गुंतवणुकीसाठी प्रामुख्याने गुंतवणूकदार जो काही पर्याय निवडतात तो निवडताना मात्र गुंतवणुकीची सुरक्षितता अगोदर विचारात घेतात व दुसरे म्हणजे ज्या ठिकाणी गुंतवणूक करून आपल्याला चांगला परतावा मिळेल अशा गुंतवणूक पर्यायाची निवड करत असतात.
या दोन्ही मुद्द्यांच्या आधारे जर आपण बघितले तर पोस्ट ऑफिसच्या आणि बँकांच्या मुदत ठेव योजनांना बहुतेक करून गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते.परंतु अलीकडच्या कालावधीत मात्र म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला असून यामध्ये देखील आता मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे.
या अनुषंगाने जर आपण बघितले तर पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव म्हणजेच आरडी आणि एसआयपी दोन पर्यायांमध्ये गुंतवणूक केली तर कोणत्या ठिकाणी जास्त परतावा मिळेल? हे देखील महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीचे हे दोन्ही भिन्न पर्याय आहेत. या दोन्ही पर्यायांमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवावी लागते.
दोघी पर्यायांचा जर आपण तुलनात्मक दृष्टीने विचार केला तर आरडी मध्ये तुम्हाला निश्चित परतावा मिळतो आणि केलेल्या गुंतवणुकीवर कुठल्याही प्रकारची जोखीम नसते.परंतु एसआयपीमध्ये जर गुंतवणूक केली तर या माध्यमातून मिळणारा परतावा निश्चित नसतो.
कारण हे बाजारावर आधारित योजना असल्यामुळे शेअर बाजाराचा काही प्रमाणात यामध्ये धोका असतो. या अनुषंगाने जर प्रत्येक महिन्याला पाच हजाराची गुंतवणूक आरडी आणि एसआयपी या गुंतवणूक पर्यायामध्ये केली तर कोणत्या ठिकाणी जास्त परतावा मिळेल याची माहिती घेऊ.
आरडीमध्ये पाच वर्षासाठी पाच हजार रुपये जमा केल्यावर किती व्याज मिळेल?
तुम्हाला जर आरडी खाते उघडायचे असेल तर तुम्ही देशातील कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकतात. यामध्ये पोस्ट ऑफिस पाच वर्षाच्या आरडीवर 6.7% वार्षिक व्याज देत आहे. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये दर महिन्याला पाच हजाराची आरडी केली तर पाच वर्षात तुमची एकूण गुंतवणूक तीन लाख रुपये होते.
या तीन लाखावर तुम्हाला 6.7% या व्याजदरानुसार 56 हजार 830 रुपये व्याज मिळेल व एकूण तुमची जमा रक्कम आणि व्याज असे मिळून तुम्हाला तीन लाख 56 हजार 830 रुपये मिळतील.
पाच वर्षासाठी प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची एसआयपी केली तर किती परतावा मिळेल?
दुसरीकडे जर तुम्ही पाच वर्षाकरिता पाच हजार रुपयांची एसआयपी केली तर या ठिकाणी देखील तुमची पाच वर्षांमध्ये एकूण गुंतवणूक तीन लाख रुपये होते.
जर प्रत्येक वर्षी अंदाजे 12 टक्क्यांचा परतावा तुम्हाला एसआयपीत मिळाला तर व्याजापोटी तुम्हाला एक लाख 12 हजार 432 रुपयाचा फायदा होईल व तुमची केलेली गुंतवणूक आणि व्याज मिळून तुम्हाला चार लाख 12 हजार 432 रुपयांचा निधी मिळू शकतो.
यावरून आपल्याला दिसून येते की एसआयपीमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर जो काही परतावा मिळतो तो आरडीमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या तुलनेत जवळपास दुप्पट असतो. याशिवाय एसआयपीमध्ये तुम्हाला चक्रवाढीचा फायदा देखील मिळतो.