Post Office Investment Scheme:- गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर सुरक्षित गुंतवणूक आणि हमी परतावा खूप महत्त्वाचा असतो. या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या अनेक योजना खूप महत्त्वाच्या आहेत व त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात.
यामध्ये जर आपण पोस्ट ऑफिसच्या योजना बघितल्या तर अनेक प्रकारच्या योजना पोस्ट ऑफिस राबवत असून यामध्ये पेन्शन योजने पासून तर अनेक प्रकारच्या बचत योजनांचा समावेश आहे.
परंतु यामध्ये पोस्ट ऑफिसची जर किसान विकास पत्र ही योजना बघितली तर ती गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय असून ही एक पोस्ट ऑफिसच्या सर्वात जुन्या योजनांपैकी एक असून तेवढीच लोकप्रिय योजना आहे.
या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे दुप्पट करण्याचे हमी देते. म्हणजेच तुम्ही जर दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर ही योजना मॅच्युअर झाल्यावर तुम्हाला वीस लाख रुपये मिळतात.
कुणाला घेता येतो या योजनेचा लाभ?
तसे पाहायला गेले तर ही पोस्ट ऑफिसची खूप जुनी योजना असून तिची सुरुवात 1988 मध्ये करण्यात आलेली होती. किसान विकास पत्र असे या योजनेचे नाव असून ही योजना प्रामुख्याने शेतकरी वर्गासाठी तयार करण्यात आलेली होती. परंतु त्यातच सर्व नागरिकांसाठी कोणतीही प्रौढ व्यक्ती एकल किंवा संयुक्त खाते उघडून यामध्ये गुंतवणूक करू शकते.
दहा वर्षापेक्षा जास्त वयाचे मुल असेल तर ते देखील त्याच्या नावावर या योजनेत खाते उघडू शकते. या योजनेमध्ये खाते उघडण्याकरिता आधार कार्ड तसेच वयाचा दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि अर्ज फॉर्म अशी काही महत्त्वाची कागदपत्र आवश्यक असतात. अनिवासी भारतीयांना मात्र या योजनेत गुंतवणूक करता येत नाही.
करता येते 1000 रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात
किसान विकास पत्र योजनेमध्ये तुम्हाला एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येऊ शकते. या योजनेमध्ये कमाल गुंतवणुकीची कुठलीही मर्यादा नाही. म्हणजेच तुम्हाला हवी तितकी रक्कम तुम्ही या योजनेत गुंतवू शकतात व जास्तीचा फायदा मिळवू शकतात.
1000 रुपयापासून गुंतवणूक सुरू केल्यानंतर तुम्ही शंभर रुपयांच्या पटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. या योजनेत संयुक्त खाते उघडून देखील गुंतवणूक करता येते व यासोबतच किसान विकास पत्र योजनेत नॉमिनीची सुविधा देखील उपलब्ध आहे.
9 वर्ष आणि सात महिन्यात म्हणजे 115 महिन्यात पैसे होतात दुप्पट
किसान विकास पत्र योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत गुंतवणूक केलेले पैसे दुप्पट होतात व त्याचे एक समीकरण आहे.ते म्हणजे..
याकरिता तुम्हाला 9 वर्ष आणि सात महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागेल. समजा तुम्ही या योजनेमध्ये जर 115 महिन्यांकरिता एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 115 महिन्यांमध्ये एक लाखाचे दोन लाख रुपये होतात. पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर दहा लाख रुपये मिळतात.
अगोदर या योजनेमध्ये पैसे दुप्पट होण्यासाठी साधारणपणे 123 महिन्यांचा कालावधी लागायचं. परंतु सरकारने जानेवारी 2023 मध्ये हा कालावधी कमी करून 120 महिने केला आणि काही महिन्यानंतर अधिक फायदा देण्याच्या दृष्टिकोनातून कालावधी कमी करून आता 115 महिन्यांवर करण्यात आला आहे.
किसान विकास पत्र योजनेसाठी कुठे खाते उघडाल?
या योजनेसाठी खाते उघडणे खूप सोपे असून तुम्हाला याकरिता पोस्ट ऑफिस मध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागतो आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्ट मध्ये जमा करावे लागते.
त्यासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्र जोडावे लागते. किसान विकास पत्र योजना ही एक छोटी बचत योजना असून सरकार दर तीन महिन्यांनी त्या योजनेचा व्याजदराचा आढावा घेते आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करत असते.