Investment:- तुम्ही कितीही पैसा कमावला आणि त्या पैशांची बचत आणि गुंतवणूक केली नाही तर तुमच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. आर्थिक दृष्ट्या तुमचे भविष्य हे अंधकारमय होते व त्याकरिता गुंतवणूक फार महत्त्वाची असते. अगदी कमीत कमी रकमेची जर तुम्ही गुंतवणूक केली आणि त्यामध्ये सातत्य ठेवले तर तुमची छोटीशी गुंतवणूक काही कालावधीनंतर एका मोठ्या रकमेमध्ये रूपांतरित होते.
जे काही गुंतवणूक पर्याय उपलब्ध असतात त्या पर्यायांमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर काही व्याज मिळत असते. अशा पद्धतीने आपली गुंतवणूक ही वाढत जाते. गुंतवणुकीमध्ये चक्रवाढ म्हणजेच कंपाऊंडिंग या संकल्पनेला खूप महत्त्व असून याच्या मदतीने तुम्ही गुंतवलेले पैसे हे खूप वेगात वाढू शकतात.
दीर्घ कालावधीमध्ये तुम्हाला कंपाउंडिंग म्हणजे चक्रवाढीचा खूप मोठ्या प्रमाणावर पैसे वाढण्याचे दृष्टिकोनातून फायदा होतो. तुम्ही जी काही बचत करतात व ती बचत गुंतवतात तेव्हा त्यावर आपल्याला जे काही व्याज मिळते आणि हे मिळालेले व्याज जेव्हा तुम्ही पुन्हा गुंतवता तेव्हा तुम्हाला एकूण जमा रकमेवर अधिक व्याजाचा लाभ मिळतो. अशा पद्धतीच्या या चक्रामुळे अगदी छोट्या स्वरूपामधील गुंतवणूक तुमची कालांतराने खूप मोठा फायदा करून जाते.
चक्रवाढ किंवा कंपाऊंड बद्दल अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी काय म्हटले होते?
महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी कंपाउंडिंग किंवा चक्रवाढ याबद्दल म्हटले होते की हे एक जगातील आठवे आश्चर्य असून ज्याला चक्रवाढची ताकद समजली तो या माध्यमातून चांगले पैसे कमावतो व ज्याला समजत नाही तो बरेच काही भोगतो.
त्यामुळे चक्रवाढ किंवा कंपाउंडिंग ची ताकद काय आहे हे आपल्याला समजते. जर तुम्हाला देखील चक्रवाढ व्याज काय असते किंवा त्याची ताकद किती असते हे जर पाहायचं असेल तर त्याकरिता म्युच्युअल फंड एक उत्तम उदाहरण आपल्याला घेता येईल.
कंपाऊंडिंगमुळे शंभर रुपयाचे होतात एक लाख
समजा तुम्ही म्युच्युअल फंड किंवा इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये शंभर रुपये गुंतवले व त्यावर तुम्हाला पंधरा टक्के वार्षिक परतावा मिळतो असे समजले तर अशा स्थितीमध्ये पहिल्याच वर्षी तुमची गुंतवणूक 15 टक्क्यांनी वाढते. म्हणजेच तुमच्या शंभर रुपयाचे 115 रुपये होतात.
या पद्धतीने दुसऱ्या वर्षी सुरुवातीच्या शंभर रुपयावर फायदा होत नाही तर तुमचे जमा झालेले 115 रुपयांवर तुम्हाला पंधरा टक्के कमवता येतात. अशा पद्धतीने दुसऱ्या वर्षी तुमची गुंतवणूक 132.25 रुपये होते. म्हणजेच पहिल्या वर्षी तुम्ही शंभर रुपयावर जे काही 15 रुपये कमावलेले होते ते तुमच्या मूळ गुंतवणुकीत जोडले गेल्यामुळे त्या माध्यमातून तुम्हाला जास्तीची कमाई होत असते.
अशा पद्धतीने जसजसे वर्ष वाढत जात असते तशी तशी तुमची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने वाढत जाते. तुमचे सुरुवातीची रक्कम आणि मागील वर्षातील परतावा असं दोन्हींवर तुम्हाला या माध्यमातून नफा मिळतो. अशा प्रकारे तुम्ही पंचवीस वर्षापर्यंत जर गुंतवणूक करत गेलात तर चक्रवाढीच्या ताकदीमुळे तुमची शंभर रुपयांची गुंतवणूक एक लाख रुपये पर्यंत होईल. या पद्धतीने जितके वेळा तुमच्या केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला परतावा मिळेल तितक्याच वेगाने तुमचा पैसा वाढत जातो.