Investment Tips:- गुंतवणूक ही नियमितपणे आणि सातत्य ठेवून दीर्घ कालावधीसाठी केली तर त्यातून मिळणारा परतावा अधिक मिळतो. गुंतवणुकीमध्ये सातत्य असण्याला खूप महत्त्व आहे. त्यासोबतच चांगल्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते.
येणाऱ्या भविष्य काळामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून व्यक्ती समृद्ध राहण्याकरिता गुंतवणुकीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. त्यामुळे मुलांचे भविष्यकालीन शिक्षण व लग्नकार्य इत्यादी गोष्टींसाठी जर पैसा हवा असेल तर त्याकरिता आत्तापासून गुंतवणुकीला सुरुवात करणे खूप गरजेचे असते.
मुलांसाठी जर चांगला फंड तयार करायचा असेल तर गुंतवणूक पर्यायांमध्ये म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय ठरतो. म्युच्युअल फंड एसआयपी च्या माध्यमातून जास्तीची रक्कम व्यक्ती जोडू शकतो. समजा नुकतेच जन्माला आलेल्या मुलाच्या नावाने जर जन्मापासून गुंतवणूक करायला सुरुवात केली
तर वयाच्या 21व्या वर्षापर्यंत मुलाला करोडपती बनवण्याची क्षमता म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये आहे. परंतु त्याकरिता व्यवस्थित प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजी असणे देखील तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण यासंबंधीची एक स्ट्रॅटेजी बघणार आहोत.
हा फार्मूला येईल कामाला
यामध्ये जर तुम्ही 21×10:21 चा फॉर्मुला वापरला तर मुलगा असो किंवा मुलगी त्यांना त्यांच्या वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत करोडो रुपयांचे मालक बनवता येते. यामध्ये मुलाच्या जन्मानुसार एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू करायची आहे.
जर आपण या सूत्राचा आकड्यानुसार अर्थ पाहिला तर यामध्ये दहा चा अर्थ होतो दहा हजार रुपये. म्हणजेच तुम्हाला मुलाच्या नावे दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला एसआयपीमध्ये गुंतवणे गरजेचे राहील. एसआयपीमध्ये कमीत कमी बारा टक्क्यांचा रिटर्न मिळतो असे म्हटले जाते.
या फार्मूलानुसार मासिक दहा हजार रुपयांची एसआयपी सुरू करून सलग 21 वर्षे ती सुरू ठेवायची आहे. 21 वर्ष झाल्यानंतर तुमची एकूण गुंतवणूक यामध्ये 25 लाख वीस हजार रुपये इतके होते. जर म्युच्युअल फंड एसआयपी च्या माध्यमातून मिळणाऱ्या सरासरी परताव्याचा विचार केला तर तो 12 टक्क्यांच्या हिशोबाने मोजतात.
त्यानुसार 88 लाख 66 हजार 742 रुपये व्याज मिळते. अशा पद्धतीने तुम्ही एकूण गुंतवलेली रक्कम आणि व्याज एकत्र जोडून हिशोब केला तर तुमच्या मुलाकडे 21 वर्षानंतर एक कोटी तेरा लाख 86 हजार 742 रुपये जमा होतात.
म्हणजेच 21 व्या वर्षी तो मुलगा एक कोटींचा मालक बनतो. दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला गुंतवणे हे थोडे अवघड वाटते. परंतु तुमच्या कमाई मधील 20% कोणत्याही परिस्थितीमध्ये गुंतवणुकीसाठी पैसा बाजूला काढणे गरजेचे असते. यामध्ये पन्नास हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीने जर 20% पैसा बाजूला काढला तर तो दहा हजार रुपये सहजपणे गुंतवू शकतो. परंतु अशा पद्धतीमध्ये आपल्या काही गरजा नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे राहील.