Investment Tips:- आपण मोठ्या कष्टाने जे काही पैसे कमवतो त्या पैशांची बचत करतो व ती बचत वाढावी या दृष्टिकोनातून आपण गुंतवणूक करत असतो. गुंतवणुकीसाठी जे उपलब्ध पर्याय आहे त्यापैकी पर्यायांची निवड करताना ज्या ठिकाणी गुंतवणूक सुरक्षित राहील आणि परतावा चांगला मिळेल अशा पर्यायांची निवड प्रामुख्याने केली जाते.
परंतु ज्या गुंतवणूकदारांना जोखीम घेण्याची इच्छा असते असे गुंतवणूकदार शेअर मार्केटचा पर्याय देखील निवडतात. त्याकरिता आणि गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडतात. परंतु तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर गुंतवणूक करत असाल व तुम्हाला त्यापासून आर्थिक फायदा हवा असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
जर अशा महत्त्वाच्या काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर फायदा होणे दूरच परंतु त्यापासून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे आपण या लेखात अशा काही सात गोष्टी पाहू ज्या गुंतवणूक करताना कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
गुंतवणूक करा परंतु या सात गोष्टींची काळजी घ्या
1- गुंतवणूक करण्याअगोदर ध्येय निश्चित करा– आपण बरेच जण गुंतवणूक करायला सुरुवात करतो परंतु हे विसरतो की नेमकी आपण गुंतवणूक कशासाठी करत आहोत. गुंतवणूक करण्याचे आपले ध्येय कोणते आहे हेच आपल्याला माहीत नसतं. सेवानिवृत्ती, मुलांचे शिक्षण तसेच आजारपण किंवा विदेशात यात्रा यापैकी कोणत्या उद्देशाने गुंतवणुकीला सुरुवात करत आहात हा हेतू निश्चित करणे गरजेचे आहे.
2- नफ्याच्या मागे धावू नये– चांगला परतावा मिळत आहे म्हणून तत्काल किंवा तात्पुरत्या खरेदी विक्री करायला लागले तर नुकसान होण्याची भीती असते. यामध्ये तुमचे गुंतवणुकीचे उद्देश बाजूला पडण्याची भीती असते व नुकसान होऊ शकते.
3- म्युच्युअल फंडात ट्रेडिंग करू नये– म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हे दीर्घ कालावधी करिता केलेले असते व मुदत पूर्ण होण्याआधी हे पैसे गुंतवणूकदारांना काढता येत नाही. जर अशा म्युच्युअल फंडाची जर ट्रेडिंग म्हणजेच खरेदी विक्री केली तर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. मुदतीआधी पैसे किंवा फंडाची खरेदी विक्री करू नये.
4- बाजारावर अवलंबून राहू नये– बरेच जण परताव्याच्या आशेने सतत बाजारावर लक्ष ठेवत असतात व यामुळे झटपट फायदा मिळवून देणाऱ्या या ट्रॅपमध्ये व्यक्ती अडकतो. तुम्हाला जर दीर्घ काळासाठी गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्ही केली असेल तर त्याकरिता हे घातक ठरत असते.
5- पोर्टफोलिओमध्ये विविधता म्हणजेच वैविध्य नसणे– गुंतवणूक करताना ती अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजेच विविध क्षेत्रांमध्ये करावी व एकाच क्षेत्रावर अवलंबून राहणे धोक्याचे ठरते. नवनवीन क्षेत्रांचा अभ्यास करून व त्यातील धोक्यांचा अंदाज घेऊन त्यानंतर पोर्टफोलिओ मध्ये वैविध्य आणावे.
6- मोठ्या फायद्याची आशा ठेवणे– झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न बाळगल्यामुळे अनेक निर्णय घाईगडबडीत घेतले जातात. यातून गुंतवणुकीतील शिस्त बिघडते व नुकसान होऊ शकते.
7- गुंतवणुकीचे मूल्यमापन न करणे– तुम्ही केलेल्या गुंतवणुकीची तुम्ही वेळोवेळी समीक्षा म्हणजेच अनॅलिसिस केले पाहिजे. तुम्ही परताव्याच्या बाबतीत जे ध्येय निश्चित केलेले आहे त्यानुसार परतावा तुम्हाला मिळत आहे का याचा देखील आढावा घेणे गरजेचे आहे. तसे होत नसेल तर तुम्ही गुंतवणूक तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यानुसार बदल करणे गरजेचे आहे.