Type Of Pension:- सरकारी किंवा खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नोकरदारांच्या दर महिन्याच्या पगारातून पीएफ म्हणून काही रक्कम कापली जाते हे आपल्याला माहिती आहे. या सगळ्या पीएफचे नियमन किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारी पेन्शन याबाबतीत काही नियम असतात व त्याला ईपीएफ पेंशन नियम असे देखील म्हणतात.
पेन्शन मिळण्याकरिता ईपीएफओमध्ये दहा वर्ष योगदान देणे गरजेचे असते व त्यानंतरच तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याचा अधिकार असतो. आपल्याला माहित आहे की साधारणपणे वयाच्या 58 व्या वर्षापासून पेन्शनचा लाभ दिला जातो हा एक सामान्य नियम आहे जो सर्वांना माहिती आहे.
याव्यतिरिक्त ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पेन्शन देखील दिली जाते. काही परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला देखील पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे. परंतु याबद्दलची माहिती अनेकांना नसते.
आता तुम्ही खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करत असाल आणि प्रत्येक महिन्याला तुम्ही तुमच्या पगारातून ईपीएफमध्ये योगदान देत असाल तर ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना तुम्हाला किती प्रकारची पेन्शन देते हे देखील माहीत असणे तितकेच गरजेचे आहे.
ईपीएफओ किती प्रकारची पेन्शन देते?
1- निवृत्ती वेतन म्हणजेच निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन- हा जो काही पेन्शनचा प्रकार आहे हाच सर्वांना माहिती आहे. तुमचे वय 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ईपीएफओ द्वारे तुम्हाला निवृत्तीवेतन दिले जाते. निवृत्तीनंतर तुम्हाला किती पेन्शन मिळेल हे पेन्शन फंडात तुमच्या एकूण योगदानावर अवलंबून असते.
तुम्ही यामध्ये तुम्हाला हवे असेल तर 58 वर्षानंतर साठ वर्षापर्यंत पेन्शनचा दावा करू शकतात व अशा परिस्थितीत ईपीएफओ आपल्या सदस्यांच्या पेन्शनमध्ये दरवर्षी चार टक्के वाढ करते.
2- लवकर मिळणारी पेन्शन- जसे आपण पाहिले की वयाच्या 58 व्या वर्षापासून ईपीएफओ पेन्शन देते. परंतु जर एखाद्या कर्मचाऱ्याला पेन्शन 58 वर्षांपूर्वी घ्यायची असेल तर तो पन्नास वर्षानंतर त्यावर दावा करू शकतो. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने लवकर पेन्शनची तरतूद देखील केली आहे.
परंतु या प्रकारामध्ये ईपीएफओ सदस्यांची पेन्शन दरवर्षी चार टक्क्यांनी कमी केली जाते. उदाहरणच घ्यायचे झाले तर एखाद्याला वयाच्या 58 व्या वर्षी जर दहा हजार रुपये पेन्शन मिळवायचे असेल तर त्याने वयाच्या 57 व्या वर्षी दावा केला तर त्याला चार टक्के कमी म्हणजेच 9 हजार सहाशे रुपये पेन्शन मिळेल आणि वयाच्या 56 व्या वर्षी हे पेन्शन आठ टक्क्याने कमी झालेली असेल व ती 9 हजार दोनशे रुपये मिळेल.
3- विधवा किंवा बाल निवृत्ती वेतन- दुर्दैवाने ईपीएफओ धारकाचा जर मृत्यू झाला म्हणजेच कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि पंचवीस वर्षापेक्षा कमी वयाची दोन मुले पेन्शन मिळवण्यास पात्र असतात. यामध्ये तिसऱ्या अपत्त्याला देखील पेन्शन मिळू शकते.
पण जेव्हा पहिल्या मुलाचे पेन्शन वयाच्या 25 व्या वर्षी थांबते. त्यानंतर तिसऱ्या मुलाचे पेन्शन सुरू होते. यामध्ये महत्त्वाचे असे आहे की ईपीएफो सदस्याचा जर मृत्यू झाला तर दहा वर्षाच्या पेन्शनचा नियम म्हणजेच ईपीएफो मध्ये दहा वर्षे योगदानाचा नियम लागू होत नाही.
एखाद्या सदस्याने जर एक वर्षासाठी ईपीएफओमध्ये योगदान दिले असेल व त्याचा मृत्यू झाला तरी त्याची विधवा आणि मुले पेन्शनसाठी पात्र असतात.
4- अपंगत्व निवृत्तीवेतन- सेवेचा कालावधी सुरू असतानाच तात्पुरते किंवा कायमचे अपंगत्व आल्यास ही पेन्शन दिली जाते. या प्रकारची पेन्शन मिळवण्यामध्ये वयाची अट आणि दहा वर्षे पेन्शन फंडातील योगदान देण्याची अट लागू होत नाही.
जर एखाद्या सदस्याने दोन वर्षांसाठी ईपीएफ योजनेत योगदान दिले असेल तरी तो या प्रकारची पेन्शन मिळवण्यासाठी पात्र असतो.
5- अनाथ पेन्शन- जर एखाद्या कर्मचाऱ्याचा म्हणजेच ईपीएफओ सदस्याचा मृत्यू झाला व त्यासोबत त्याच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला तर त्याची 25 वर्षापेक्षा कमी वयाची दोन मुले या प्रकारच्या पेन्शन करिता पात्र असतात.
अशा प्रसंगी ईपीएफओ अनाथ पेन्शनची तरतूद करते. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की मुलांना ह्या प्रकारची पेन्शन त्यांच्या वयाच्या फक्त पंचवीस वर्षांपर्यंतच मिळते.
6- नॉमिनीला मिळणारी पेन्शन- ईपीएफो सदस्याला म्हणजेच कर्मचाऱ्याला जर पत्नी किंवा मुले नसतील तर त्याने केलेल्या नॉमिनीला या प्रकारची पेन्शन मिळते.
समजा एखाद्या सदस्याने जर त्याचे आई आणि वडील दोघांना नॉमिनी केले असेल तर अशा परिस्थितीत दोघांनाही निश्चित समभाग करून पेन्शनची रक्कम दिली जाते. जर एखादा नॉमिनी असेल तर मात्र नॉमिनीला संपूर्ण रक्कम मिळते.
7- आश्रित पालक पेन्शन- यामध्ये जर कर्मचाऱ्याचा म्हणजेच ईपीएफओ धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर आश्रित म्हणजे अवलंबून असलेल्या त्याच्या वडिलांना पेन्शनसाठी पात्र मानले जाते. परंतु वडिलांचे निधन झाले तर संबंधित सदस्याच्या आईला पेन्शन मिळते व ही पेन्शन आयुष्यभर मिळत राहते. याकरिता मात्र फॉर्म 10D भरावा लागतो.