Loan Insurance:- जीवनामध्ये आपण अनेक विविध गोष्टींसाठी कर्ज घेत असतो. अशा प्रकारचे कर्ज आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा वाहन खरेदी करण्यासाठी किंवा घर खरेदी करण्यासाठी आपण घेत असतो.
कर्ज घेतले म्हणजे ते आपल्याला परतफेड करावेच लागते व ठरलेल्या कालावधीत ते परतफेड करणे आपली जबाबदारी असते. परंतु आपण घेतलेले कर्ज आर्थिक दृष्टिकोनातून कधी डोकेदुखी ठरते किंवा तुमच्या पश्चात कुटुंबासाठी एक ओझे बनू शकते. अशावेळी लोन इन्शुरन्सचा पर्याय तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला कर्ज फेडण्याची कुठल्याही प्रकारची गरज उद्भवू देणार नाही.
काय आहे नेमके लोन इन्शुरन्स?
ज्याप्रमाणे आपण भविष्यकालीन वैद्यकीय खर्चाच्या नियोजनासाठी आरोग्य विमा घेतो तसेच जीवन विमा घेतो. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही घेतलेल्या होमलोन किंवा कार लोन चा देखील विमा काढू शकतात. एखाद्या विपरीत प्रसंगी किंवा अडचणीच्या वेळेमध्ये तुम्हाला हा विमा खूप फायद्याचा ठरतो.
दुर्दैवाने ज्या व्यक्तीने कर्ज घेतले आहे त्याचा जर मृत्यू झाला किंवा आर्थिक उत्पन्नाचा एखादा स्त्रोत असेल तो जर बंद झाला तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाची कर्जाच्या हप्त्यांपासून सुटका होण्याच्या दृष्टिकोनातून हा लोन इन्शुरन्स म्हणजेच कर्जाचा विमा खूप फायद्याचा ठरतो. बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही या इन्शुरन्सच्या मदतीने तुमचे कर्ज फेडू शकतात.
लोन इन्शुरन्स कसा ठरवला जातो?
तुम्ही पर्सनल लोन किंवा होम लोन घेतले असेल तर त्यासोबत तुम्ही लोन इन्शुरन्स म्हणजेच कर्जाच्या विमाचा हप्ता हा तुमच्या रेगुलर हप्त्या सोबत देखील भरू शकतात. तुम्ही जर घेतलेल्या पर्सनल लोन किंवा होम लोनचा इन्शुरन्स काढलेला असेल तर बिकट परिस्थितीमध्ये तुम्हाला बँकेचे कर्ज फेडण्याची गरज भासत नाही.
समजा तुम्ही होम लोनचा इन्शुरन्स काढला असेल तर संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला होम लोन फेडण्याची गरज भासत नाही. यातील काही लोन इन्शुरन्स पॉलिसी या कर वाचवण्यासाठी देखील फायद्याच्या ठरतात. तुमचे सध्याचे वय तसेच तुमच्या आरोग्य व कर्ज फेडण्याचा कालावधी लक्षात घेता या लोन इन्शुरन्सचा हप्ता ठरवला जातो. या इन्शुरन्सचा हप्ता तुम्ही प्रत्येक महिन्याला देखील भरू शकतात.
लोन इन्शुरन्स काढा परंतु ही काळजी घ्या
जेव्हा आपण कर्जाचा विमा घेतो तेव्हा संबंधित कंपनी अनेक प्रकारचे पर्याय आपल्या समोर ठेवते. म्हणजेच नोकरी जाणे किंवा अपघात होणे, मृत्यू होणे अशा वेगवेगळ्या परिस्थितीनुसार तुम्हाला कंपनीच्या माध्यमातून लोन इन्शुरन्स दिला जातो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करूनच तुम्ही लोन इन्शुरन्स घेणे फायद्याचे ठरते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोन इन्शुरन्स घेताना सर्व प्रकारच्या अपंगत्वाचा समावेश असणे खूप गरजेचे असते. समजा तुम्ही जॉईंट म्हणजे संयुक्तपणे एखादे कर्ज घेतलं असेल तर ते कर्ज तुमच्या या लोन इन्शुरन्समध्ये कव्हर होत आहे की नाही याची देखील खात्री करून घ्यावी.
इन्शुरन्सचा प्रीमियम भरण्याकरिता तुम्हाला कोणत्या प्रकारचे पर्याय दिले जातील याची व्यवस्थित चौकशी करून घ्यावी. संबंधित विमा कंपनीच्या या संबंधीच्या अटी आणि शर्ती काय आहेत याबद्दल सखोल अभ्यास करावा व त्यानंतर निर्णय घ्यावा.