मजबूत आर्थिक भविष्याकरिता तुम्ही कमवत असलेले पैशांची बचत व त्या केलेल्या बचतीची गुंतवणूक खूप महत्त्वाचे असते. याकरिता उपलब्ध असलेल्या अनेक गुंतवणूक पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. गुंतवणूक पर्यायांमध्ये प्रामुख्याने मुदत ठेव योजनांना जास्त प्राधान्य दिले जाते व अशा प्रकारच्या योजना या बँका व पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवल्या जातात.
या ठिकाणी गुंतवलेला रकमेवर कुठल्याही प्रकारचा धोका नसतो तसेच परतावा देखील चांगला मिळतो. पोस्ट ऑफिसच्या देखील एफडी योजना असून यामध्ये तुम्ही एक वर्ष, दोन वर्ष तसेच पाच वर्षाच्या कालावधी करता एफडी करू शकतात व पाच वर्षाची एफडी जर केली तर 7.5% दराने व्याज मिळते.
परंतु या व्यतिरिक्त जर महिलांना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांच्या करिता महिला सन्मान बचत प्रमाणपत्र नावाची खास योजना असून या योजनेत महिला फक्त दोन वर्षांमध्येच पाच वर्षाच्या एफडी इतके व्याज मिळवू शकतात. दोन वर्षांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या माध्यमातून 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते.
कोणत्या वयोगटातील महिलांना करता येईल गुंतवणूक?
या योजनेअंतर्गत कोणत्याही महिलेला खाते उघडता येऊ शकते. परंतु जर 18 वर्षाखालील मुलगी असेल तर तिच्या मार्फत तिचे पालक खाते उघडू शकतात. महिलांना बचत करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असून
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर महिलांना चक्रवाढ व्याजाचा लाभ 7.5 टक्के दराने मिळतो आणि व्याजाची गणना ही तिमाही आधारावर करण्यात येते. त्यामुळे या योजनेत जर महिलांनी पैसा गोळा केला तर चांगला नफा मिळतो.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेनुसार किती पैसे गुंतवले तर किती फायदा मिळतो?
जर आपण पोस्ट ऑफिसच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे कॅल्क्युलेटर नुसार बघितले तर या योजनेमध्ये महिलांनी 50 हजार रुपये गुंतवले तर दोन वर्षात आठ हजार अकरा रुपये त्यांना व्याज मिळते अशाप्रकारे व्याज व मुद्दल मिळवून दोन वर्षात 58 हजार 11 रुपये मिळतात.
एक लाख रुपये गुंतवले तर दोन वर्षात एक लाख 16 हजार 22 रुपये मिळतात. जर दीड लाख रुपये जमा केले तर दोन वर्षांनी एक लाख 74 हजार 33 रुपये मिळतील म्हणजेच दोन वर्षात 24 हजार 33 रुपये व्याज मिळते. समजा महिलांनी जर या योजनेत दोन वर्षाकरिता दोन लाख रुपये गुंतवले तर 7.5% व्याजदराने 32 हजार 44 रुपये व्याज मिळते व एकूण मुद्दल व व्याज मिळून दोन वर्षात दोन लाख 32 हजार 44 रुपये मिळतात.
या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये
या योजनेचा परिपक्वता कालावधी दोन वर्षाचा असून तुम्हाला दोन वर्षांनी तुमची गुंतवणूक व्याजासह परत मिळते. परंतु जर कालावधी पूर्ण होणे आधी तुम्हाला अचानक पैशांची गरज असली व या योजनेत खाते उघडून एक वर्ष पूर्ण झाले असेल तर तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 40% रक्कम काढू शकतात.
या योजनेसाठी कुठे उघडावे लागेल खाते?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजने करिता खाते उघडायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या शाखेत जाऊन खाते उघडू शकतात. यामध्ये तुम्हाला फॉर्म एक भरणे गरजेचे राहिल व त्यासोबत आधार व पॅन कार्ड सारख्या केवायसी कागदपत्रांची प्रत आणि काही कागदपत्रे द्यावे लागतील.