शेतीसाठी वेळेवर पैसा उपलब्ध होणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि भरघोस उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने देखील खूप महत्त्वाचे आहे. कारण शेतीची कामे जितक्या वेळेत पूर्ण होतात किंवा पिकांचे व्यवस्थापन जितके वेळेत पूर्ण होणे गरजेचे असते तितके ते महत्त्वाचे असते.
मागील काही वर्षापासून पाहिले तर अवकाळी व गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो व त्यामुळे हातचे पीक वाया जाते. साहजिकच यामुळे पुढच्या हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसा राहत नाही व नाईलाजाने त्यांना बँकांकडे कर्जासाठी मागणी करावी लागते.
परंतु बँकांकडून मिळणारे कर्ज हे वेळेवर उपलब्ध होत नाही व त्याकरिता शेतकऱ्यांना बऱ्याचदा बँकांच्या खेटा माराव्या लागतात. परंतु आता शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी तीन ते चार आठवड्यांची वाट पहावी लागणार नाही तर फक्त पाच मिनिटांमध्ये शेतकऱ्यांना आता कर्ज मिळणार आहे व त्याकरिता नाबार्डने पुढाकार घेतला आहे.
शेतकऱ्यांना बँकेतून मिळेल पाच मिनिटात कर्ज
शेतकऱ्यांना आता कर्ज घेणे अतिशय सोपे होणार असून शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज अवघ्या पाच मिनिटांमध्ये मिळणार आहे. याकरिता राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड व रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये करार करण्यात आलेला आहे. नाबार्डने आपल्या ई-केसीसी लोन प्लॅटफॉर्मला रिझर्व बँकेच्या पूर्ण मालकीच्या रिझर्व बँक इनोव्हेशन हबच्या पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिट सोबत जोडले जाणार आहे.
यामध्ये नाबार्डने सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी डीजीटायजेशन किसान क्रेडिट कार्ड कर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ॲग्री लोनच्या डिजिटायझेशन मुळे आता बँकांचे कार्यक्षमता सुधारेल आणि शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा करणे शक्य होईल.
नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बंसल यांनी भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून त्यांनी याबाबत सांगितलेल्या माहितीनुसार भागीदारीमुळे आता कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातील बारा कोटी शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या कर्ज वाटपाचा कालावधी हा तीन ते चार आठवड्या ऐवजी फक्त पाच मिनिटांवर येईल.