राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनधारकांची पेन्शन वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आता एक नवीन प्रणाली सुरू करण्यात आलेली असून आता या नवीन प्रणालीनुसार पेन्शन धारक आणि अधिकारी व कर्मचारी यांचे पगार रिझर्व बँकेच्या माध्यमातून केले जाणार आहेत. अगोदरच्या प्रणालीमध्ये बदल करत सरकारने सरकारी नोकरदारांना देण्यात येणारा पगार व सेवानिवृत्तीधारकांची पेन्शन यामध्ये सुसूत्रता यावी याकरिता प्रणालीमध्ये बदल केला आहे.
1 एप्रिलपासून ई– कुबेर प्रणाली लागू
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यातील सरकारी नोकरांचे पगार आणि सेवानिवृत्तांच्या पेन्शनमध्ये सुसूत्रता यावी याकरिता शासनाच्या माध्यमातून प्रणालीमध्ये बदल करण्यात आला आहे व त्यानुसार आता पेन्शनधारकांची पेन्शन आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार हे रिझर्व बँकेकडून केले जाणार आहेत.
या नवीन पद्धतीत आता शासन रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे पैसे जमा करेल व त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर थेट रिझर्व बँकेच्या माध्यमातून पैसे पाठवले जाणार आहेत. विशेष म्हणजे एप्रिल महिन्याचे पेन्शन या ई कुबेर प्रणालीच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे.
परंतु यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी बँकेचे खाते देताना आयएफएससी कोड बदलले नसतील अशा निवृत्तीवेतनधारकांना मात्र फटका बसण्याची शक्यता आहे. ही प्रणाली एक एप्रिल पासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलेली असून त्यानुसार आता पेन्शन देण्यासाठी असलेली ईसीएस, एनईएफटी, सीएमपी, सीएमपी फास्ट प्लस इत्यादी पर्याय आता बंद करून पूर्ण क्षमतेने ई कुबेर प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश देखील राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिले आहेत.
अगोदर साधारणपणे निवृत्तीवेतनधारकांची पेन्शन स्टेट बँक ऑफ इंडिया कडून वितरित केली जात होती.परंतु आता या नवीन बदलानुसार ई कुबेर प्रणालीच्या माध्यमातून रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे वितरित केली जाणार आहे. परंतु आता यामध्ये जे एसबीआयचे खातेधारक असणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आयएफएससी कोड द्यावा लागणार आहे.
यामध्ये आता शासकीय कार्यालयाकडून आलेली कर्मचाऱ्यांची यादी कोषागार कार्यालयाकडून रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पगार टाकण्यात येणार आहे.
या नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीत येत आहेत अडचणी
निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी जेव्हा निवृत्तीवेतन सुरू केले त्यावेळी जिल्ह्यातील बँकेत खाते उघडले आहेत. परंतु या बँक खात्याची कोषागार कार्यालयास माहिती न देता परस्पर जिल्हा बाहेर व जिल्ह्यातील इतर बँकेमध्ये ते वर्ग करून घेतल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे दुसऱ्या बँकेत खाते वर्ग केल्यामुळे बँक आयएफएससी कोडमध्ये बदल झाल्याचे ई कुबेर प्रणाली अंमलबजावणी करताना दिसून आले आहे. त्यामुळे निवृत्तीवेतन घेण्यासाठी ज्या ठिकाणी खाते आहे त्या बँक शाखेचा आयएफएससी कोड कोषागार कार्यालयाला देणे गरजेचे आहे.