कुठल्याही प्रकारच्या व्यवसायाची निवड करताना प्रामुख्याने भांडवल आणि त्या व्यवसायातून मिळणारा नफा याचा प्रामुख्याने विचार केला जातो. जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर कमीत कमी गुंतवणुकीमध्ये खूप चांगल्या प्रकारे नफा देणारे अनेक व्यवसाय आहेत. जे अगदी कमीत कमी जागेमध्ये आणि अगदी वीस ते तीस हजार रुपये भांडवल टाकून देखील सुरू करता येतात.
त्यामुळे एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करायचा विचार असेल तर असेच कमीत कमी भांडवलातून चांगला आर्थिक नफा देणाऱ्या व्यवसायाची निवड करणे गरजेचे असते. याच दृष्टिकोनातून जर आपण आउटडोअर पिझ्झा व्यवसायाचा विचार केला तर हा व्यवसाय तुम्ही अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये एक यंत्र विकत घेऊन सुरुवात करू शकतात व चांगला नफा मिळवू शकतात. याच व्यवसायाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
आउटडोअर पिझ्झा व्यवसाय
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी पब्लिक एरिया आहे म्हणजे लोक जास्त प्रमाणात फिरतात किंवा लोकांची गर्दी असते अशा ठिकाणची जागा निवडणे गरजेचे आहे. एखादे गजबजलेले मार्केट किंवा शॉपिंग मॉल इत्यादी ठिकाणी तुम्ही जागेची निवड करून हा व्यवसाय सुरू करू शकतात. विशेष म्हणजे याकरता तुम्हाला आउटडोर पिझ्झा मशीन खरेदी करून या व्यवसायाला सुरुवात करता येईल. यासोबतच पिझ्झा बेस आणि पिझ्झा बनवण्यासाठी जो काही कच्चामाल लागतो तो तुम्हाला लागेल. या पिझ्झा मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अवघ्या पाच मिनिटांमध्ये पिझ्झा बनुन तयार होतो.
आउटडोर पिझ्झा बनवण्याकरिता लागणारा कच्चा माल
पिझ्झा बनवण्याकरिता तुम्हाला मैदा किंवा पिझ्झा बेस, ऑलिव्ह ऑइल, ड्राय ईस्ट, साखर, मीठ,रवा, चीझ, बेकिंग पावडर, सोडा, टोमॅटो, शिमला मिरची आणि हिरवी मिरची तसेच कांदा आणि ओरिगॅनो इत्यादी कच्चा माल लागतो.
पिझ्झा बनवणे असते खूप सोपे
पिझ्झा बनवणे खूप सोपे असून पिझ्झा बेस पासून टॉपिंग्स पर्यंत सर्व काही अतिशय उत्तम दर्जाचे साहित्य आता ऑनलाईन उपलब्ध आहे. हे साहित्य तुम्ही फक्त अनबॉक्स करायचे आहे व ते शिजवण्याकरिता ओव्हनमध्ये पॉप करायचे आहे. त्यामध्ये चांगल्या प्रतीचा पिझ्झा काही वेळात तयार होतो.
आउटडोअर पिझ्झा ओव्हन मशीन
एक महत्त्वाचे यंत्र असून तुम्हाला हे मशीन चांगला पैसाच नाही तर या व्यवसायामध्ये प्रसिद्ध देखील करण्यास मदत करेल. हे मशीन अनेक कंपन्यांच्या माध्यमातून बनवले जाते व त्याची किंमत पाहिजे तर ती 11000 ते 50 हजार पर्यंत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे वीज, एलपीजी गॅस आणि कोळशाच्या माध्यमातून देखील चालवले जाते. यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार मशीनची निवड करू शकतात.तुम्हाला जर एखाद्या पिकनिक स्पॉटवर हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्याकरिता गॅस किंवा कोळशावर चालणारे यंत्र विकत घेणे गरजेचे आहे.
या व्यवसायातून किती नफा मिळू शकतो?
आऊटडोअर पिझ्झा ओवन साठी चार बाय चार/ सोळा चौरस फूट जागेची गरज असून खुल्या जागेत देखील तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात. यामध्ये तुम्ही दर्जेदार असे पिझ्झा बेस आणि टॉपिंग वापरले तर अवघ्या पंचवीस रुपयांमध्ये पिझ्झा तयार होतो. यामध्ये मशीन, कोळसा आणि गॅस आणि पिझ्झा बॉक्स यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
जर आपण बाजारातील पिझ्झाची किंमत पाहिली तर ती साधारणपणे 120 रुपये एवढी आहे. परंतु तुम्ही 90 ते 100 रुपयांमध्ये देखील विकू शकतात. म्हणजेच एका पिझ्झा तुम्हाला 74 ते 75 रुपयांचा नफा देऊ शकतो. एका दिवसामध्ये तुम्ही शंभर पिझ्झा जरी विकले तरी तुम्ही साडेसात हजार रुपयांचा निव्वळ नफा कमवू शकता किंवा 50 पिझ्झा जरी विकले तरी तीन हजार रुपये कमावणे शक्य आहे.