समाजातील आर्थिक विषमतेची दरी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जात असून याकरिताच अनेक योजनांची आखणी व अंमलबजावणी सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. यामध्ये व्यवसाय उभारणीला आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनांपासून तर महिलांना देखील आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम बनवता यावे याकरिता महिलांसाठी देखील खास योजना राबविण्यात येत आहे.
भारतामध्ये अनेक कामगार असे आहेत की ते त्यांच्या परंपरागत व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे अशा कामगारांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आर्थिक दृष्टिकोनातून मदत होईल याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून 18 विविध श्रेणीतील कारागिरांना कर्जाची सुविधा मिळते. याच योजनेविषयीची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत.
या व्यावसायिक कारागिरांना मिळतो आर्थिक आधार
पीएम विश्वकर्मा योजना ही मागच्या वर्षी 17 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आलेली योजना असून या योजनेच्या माध्यमातून समाजातील 18 व्यावसायिक श्रेणीतील कारागिरांना आर्थिक मदत केली जाते. या योजनेच्या माध्यमातून बोट बनवणारे कारागीर, सुतार, लोहार, हातोडा आणि टूलकिट बनवणारे, कुलूप बनवणारे कारागीर तसेच सोनार,
कुंभार, दगडी कोरीव काम करणारे म्हणजेच शिल्पकार, मोची, दगड तोडणारे कारागीर तसेच गवंडी, टोपली/ चटई/ झाडू बनवणारे कारागीर, बाहुली आणि खेळणी बनवणारे पारंपारिक व्यावसायिक, धोबी, शिंपी आणि मासेमारी जाळी निर्मितीमध्ये गुंतलेले कारागीर हे व आणखी इतर कारागिरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
या योजनेच्या माध्यमातून कारागिरांना मिळते तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज
पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून कारागिरांना तीन लाख रुपयापर्यंत कर्जाचा लाभ दिला जातो व विशेष म्हणजे याकरिता कुठल्याही प्रकारचे तारण द्यायची गरज राहत नाही. हे कर्ज 18 महिने व तीस महिन्याच्या कालावधी करिता दिले जाते. 18 महिन्याच्या कालावधी करीत एक लाख आणि तीस महिन्याच्या कालावधी करिता दोन लाख अशाप्रकारे कर्जाचे स्वरूप आहे.
हे कर्ज पाच टक्के निश्चित सवलतीच्या व्याजदराने कारागिरांना मिळते. यामध्ये मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केलेले जे काही लाभार्थी आहेत त्यांना एक लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज सहाय्याचा पहिला हप्ता दिला जातो व दुसऱ्या कर्जाचा हप्ता फक्त त्याच कारागरांना मिळतो ज्यांनी पहिला हप्ता घेतलेला आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधावा
या योजनेविषयी तुम्हाला अधिकची माहिती व या योजनेचे मार्गदर्शक तत्वे माहिती करून घ्यायचे असतील तर तुम्ही pmvishwakarma.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकतात. तुम्हाला या योजनेविषयी कुठलीही माहिती हवी असेल तर तुम्ही 18002677777 हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय तुम्ही pm-vishwakarma@dcmsme.gov.in या मेल आयडी वर मेल करू शकतात.