Post Office FD Scheme:- गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये प्रामुख्याने गुंतवणूकदार गुंतवणुकीची सुरक्षितता आणि चांगल्या परताव्याचे हमी या दृष्टिकोनातून बँकांच्या मुदत ठेव योजना, सरकारच्या अनेक अल्पबचत योजना आणि पोस्ट ऑफिसच्या योजनांना प्राधान्य देतात. त्या खालोखाल म्युच्युअल फंड एसआयपी आणि एलआयसीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार गुंतवणूक करत असतात.
परंतु या सगळ्यांमध्ये जर आपण बघितले तर बँकांच्या मुदत ठेव योजना या गुंतवणुकीसाठी जास्त करून प्राधान्य दिल्या जाणाऱ्या योजना आहेत. कारण बँकांमध्ये सुरक्षितता असतेच परंतु चांगल्या परताव्याचे हमी देखील गुंतवणूकदारांना मिळते. परंतु बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसच्या देखील गुंतवणुकीचे सुरक्षितता आणि चांगल्या परताव्याच्या बाबतीत मुदत ठेव योजना असून यामध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केल्यावर चांगला रिटर्न मिळतो.
कशी आहे पोस्ट ऑफिसची फिक्स डिपॉझिट स्कीम?
पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणुकीवर हमीदराने परतावा मिळतो.तसेच जेव्हा या ठेवीची मुदत पूर्ण होते तेव्हा तुम्हाला पैसे काढता येतात. अशा पद्धतीने पैसे काढल्यावर तुमची जमा झालेली एकूण मूळ रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज मिळून तुम्हाला एकत्रित रक्कम मिळते.
पोस्ट ऑफिसच्या मुदत योजनेमध्ये तुम्ही एक, दोन,तीन आणि पाच वर्षाच्या कालावधी करिता मुदत ठेव ठेवू शकतात किंवा एफडी करू शकता. यामध्ये जर तुम्ही पाच वर्षाकरिता पोस्ट ऑफिस एफडी केली तर त्यावर तुम्हाला 7.5 टक्के व्याजदर मिळतो व हा तुम्हाला वार्षिक आधारावर दिला जातो. परंतु याची गणना ही तिमाही आधारावर होत असते.
पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांपासून गुंतवणूक करू शकता व यामध्ये गुंतवणुकीची जास्तीत जास्त रकमेची मर्यादा नाही. तसेच तुम्ही यामध्ये संयुक्त खाते देखील उघडू शकतात.
तुम्हाला जर तुमच्या घरातील अल्पवयीन मुलाच्या वतीने खाते उघडायचे असेल तर ते मुलांच्या वतीने पालकांना उघडता येते. समजा तुमची पाच वर्षाची एफडीचा कालावधी पूर्ण व्हायच्या बाकी आहे व तुम्हाला जर परत या कालावधीत वाढ करायची आहे तर तुम्ही पुन्हा त्यात 18 महिन्यांसाठी वाढ करू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या एफडी स्कीममध्ये किती लाख गुंतवले तर किती मिळेल परतावा?
1- समजा तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या मुदत ठेव योजनेमध्ये तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला एक लाख 34 हजार 984 रुपये व्याज मिळते व या योजनेची मुदत संपल्यानंतर तुम्हाला तुमची एकत्रित गुंतवलेली रक्कम आणि मिळणारे व्याज असे मिळून चार लाख 34 हजार 984 रुपये मिळतात.
2- पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेमध्ये जर तुम्ही पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला त्यावर दोन लाख 24 हजार 974 रुपये व्याज मिळू शकते व या योजनेची मुदत संपल्यावर तुम्हाला तुमची जमा झालेली एकूण रक्कम आणि मिळालेले व्याज असे मिळून सात लाख 24 हजार 974 रुपये मिळतात.
3- तुम्ही या पोस्ट ऑफिसच्या मुदत योजनेमध्ये दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यावर तुम्हाला चार लाख 49 हजार 948 रुपये व्याज मिळू शकते. या योजनेची मुदत संपल्यानंतर तुम्हाला तुम्ही जमा केलेली मूळ रक्कम व त्यावर मिळालेले व्याज असे मिळून 14 लाख 49 हजार 948 रुपये रक्कम मिळते.