Post Office Scheme:- कमावलेला पैसा आणि त्या पैशांची भविष्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणुकीला खूप महत्त्व असून त्यामुळे बरेच व्यक्ती कमावलेल्या पैशाचे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. गुंतवणूक करताना आपल्याला त्या माध्यमातून मिळणारा परतावा आणि गुंतवणुकीची सुरक्षितता या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून व्यक्ती गुंतवणूक करत असतात.
गुंतवणुकीसाठी आपल्याला अनेक बँकांच्या योजना तसेच सरकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करता येते. सरकारच्या योजना किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक सुरक्षित राहतेच परंतु चांगल्या व्याजदराचा लाभ देखील गुंतवणूकदारांना मिळत असतो.
अगदी याच पद्धतीने आपण पोस्ट ऑफिसच्या योजना पाहिल्या तर त्या गुंतवणुकीसाठी अतिशय फायद्याच्या अशा समजल्या जातात. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या काही योजना अशा आहेत त्यावर गुंतवणूक केल्यास चांगला व्याजदर तर मिळतोच परंतु तुम्हाला कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाते.
अशा प्रकारच्या पोस्ट ऑफिसच्या योजनांचा विचार केला तर यामध्ये पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडी योजना उत्तम परताव्या देण्यासाठी प्रसिद्ध आहेच परंतु या योजनेच्या माध्यमातून तुम्ही कर्ज देखील घेऊ शकतात. या योजनेमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला काही पैशांची गुंतवणूक करणे गरजेचे असते व यावर तुम्हाला व्याज दिले जाते.
पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट अर्थात आरडी योजना
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडी खात्यावर कर्ज देखील घेऊ शकता व तुम्हाला तुमच्या आरडीवर जर कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला 12 हप्ते या योजनेमध्ये जमा करणे गरजेचे असते. म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला गुंतवणूक सुरू करून एक वर्ष पूर्ण झालेली असणे गरजेचे आहे.
आरडी खातेधारकाला त्याच्या खात्यातील रकमेवर 50% कर्ज मिळू शकते व घेतलेल्या कर्जाची रक्कम तुम्ही एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये परत करू शकतात. फक्त यामध्ये तुमच्या गुंतवणुकीवर आरडी खात्याच्या माध्यमातून जे व्याज मिळते त्यापेक्षा तुम्हाला घेतलेल्या कर्जावर दोन टक्के जास्तीचे व्याज द्यावे लागते.
पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेच्या माध्यमातून कसे घेता येते कर्ज?
याकरिता तुम्हाला पोस्ट ऑफिस मध्ये जावे लागते व पासबुक सह कर्जाचा फॉर्म भरणे गरजेचे असते व त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आरडी खात्याच्या माध्यमातून पोस्ट ऑफिस कर्ज देते.
आरडी योजनेत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर किती व्याज मिळते?
समजा तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची गुंतवणूक केली तर त्यावर पाच वर्षांनी 6.7 टक्क्यांचे व्याज मिळते व या योजनेच्या परिपक्वतेनंतर तुम्हाला तीन लाख 56 हजार 830 रुपये परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिसच्या इतर योजना व मिळणारा व्याजदर
पोस्ट ऑफिसच्या इतर देखील अनेक योजना असून त्यामध्ये गुंतवणूक केल्यावर देखील चांगला व्याजदर मिळतो. या योजना म्हणजे
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेत तुम्हाला 7.7% चा व्याजदर मिळतो. त्यासोबतच किसान विकास पत्र 7.5%, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ 7.1%, सुकन्या समृद्धी योजना 8.2%, ज्येष्ठ नागरिक बचत योजना 8.2% आणि मासिक उत्पन्न योजना 7.4% अशा प्रकारे तुम्हाला पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने व्याजदर मिळतो.