Construction Home Loan: कन्स्ट्रक्शन होमलोन आणि होमलोन मधील फरक काय असतो? स्वतःच्या जमिनीवर घर बांधण्यासाठी होमलोन कसे घ्यावे?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Construction Home Loan:- स्वतःचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच जण बँकेकडून कर्ज घेऊन स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात. घर खरेदी करण्यासाठी आपण बँकेच्या माध्यमातून सहजपणे होमलोन घेतो. 

होमलोनचा विचार केला तर आपण रेडी टू मूव्ह म्हणजेच एखादं घर किंवा फ्लॅट खरेदी करतो व त्याकरिता आपण होमलोन घेत असतो. परंतु बऱ्याचदा आपल्याकडे स्वतःची जागा किंवा प्लॉट असतो व त्यावर आपल्याला घर बांधायचे असते.

मात्र अशा स्वतःच्या जागेवर घर बांधण्यासाठी आपल्याला होम लोन मिळते का आणि मिळते तर कसे मिळेल व त्यासाठी कुठल्या अटी पूर्ण कराव्या लागतात? हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे असते.

आजकालच्या परिस्थितीमध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये देखील  प्लॉट खरेदी केले जातात व त्यावर घर बांधले जातात. परंतु जर आपण यासाठी मिळत असलेल्या कर्जाचा विचार केला तर स्वतःच्या जमिनीवर घर बांधताना कर्ज घेण्याची जी काही प्रक्रिया आहे थोडी किचकट असते.

शहरामध्ये फ्लॅट खरेदी करणे व त्यासाठी गृह कर्ज घेणे सोपे आहे. परंतु स्वतःच्या प्लॉटवर घर बांधण्यासाठी बँका बांधकाम गृह कर्ज देत असतात व त्यालाच आपण कन्स्ट्रक्शन होम लोन असे देखील म्हणतात. यामध्ये फ्लॅटसाठी जे काही आपण गृहकर्ज घेतो त्याचे पैसे थेट बिल्डरला जातात तर कन्स्ट्रक्शन होम लोनमध्ये कर्जाचे पैसे हे संबंधित जागा मालकाकडे जातात.

 होमलोन आणि कन्स्ट्रक्शन होमलोन मधील फरक काय असतो?

 कन्स्ट्रक्शन होमलोन हे फ्लॅट किंवा रेडी टू मूव्ह होमलोन पेक्षा संपूर्णपणे वेगळे असते. एवढेच नाही तर मिळणारी रक्कम आणि सेवाशर्तीमध्ये देखील बराच फरक असतो.

बँकेकडून पेमेंट आणि ईएमआय भरण्याच्या पद्धती व व्याजदरात देखील मोठा फरक आहे. कन्स्ट्रक्शन होमलोन म्हणजेच घर बांधण्यासाठी तुम्ही गृहकर्ज कसे घेऊ शकतात? याबद्दलची माहिती आपण बघू.

1- लागणारे आवश्यक कागदपत्रे गोळा करणे- कन्स्ट्रक्शन होमलोन अर्थात बांधकाम गृहकर्जासाठी काही विशेष प्रकारचे कागदपत्र आवश्यक असतात. याकरिता तुम्ही ज्या जागेवर घर बांधणार आहात ती तुमच्या नावावर आहे हे सिद्ध करणे गरजेचे असते.

म्हणजेच साहजिकच त्याकरिता तुम्हाला त्या जमिनीची कागदपत्र बँकेला द्यावी  लागतात. समजा ती जागा तुम्ही नुकतीच खरेदी केली असेल तर रजिस्ट्री पेपर पुरेसा ठरतो. परंतु संबंधित जागा जर वडिलोपार्जित असेल तर तुम्हाला बँकेला ही बोजा प्रमाणपत्र द्यावे लागेल.

म्हणजेच तुमच्या जमिनीवर कोणतीही थकबाकी किंवा वाद नसल्याचा पुरावा म्हणून बोजा प्रमाणपत्र महत्त्वाचे असते. फ्रीहोल्ड प्लॉटवर कर्ज सहज उपलब्ध आहे तर लिजहोल्डच्या बाबतीत तुमच्याकडे दीर्घकालीन लीज असणे गरजेचे आहे.

याशिवाय केवायसी आणि उत्पन्नाचा पुरावा बँकेला द्यावा लागेल  तसेच तुम्ही जे काही घर बांधणार आहात त्याचा आराखडा बँकेला देणे गरजेचे आहे. तसेच जागेचा लेआउट स्थानिक संस्था तसेच प्राधिकरण किंवा ग्रामपंचायतींनी मंजूर केलेला असावा.

तसेच घर बांधण्यासाठी किती खर्च येईल याचा अंदाज वास्तुविशारद किंवा इंजिनीयरने प्रमाणित केला असणे गरजेचे आहे. हे सर्व कागदपत्र बघितल्यानंतरच बँक तुमच्या कर्जाची प्रक्रिया सुरू करते.

2- मंजूर कर्जाचे पैसे हप्त्याने मिळतात- तुमची कागदपत्रे बरोबर असतील आणि प्लॉटची बँकेने तपासणी केली असेल तर कर्ज मंजूर होते. यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे कन्स्ट्रक्शन होम लोन मध्ये तुम्हाला सर्व पैसे एकत्र मिळत नाहीत.

तुमचे बांधकाम पूर्ण झाल्यावर बँका तुम्हाला कर्जाचे पैसे देतात. म्हणजेच तुम्हाला बांधकाम सुरू असताना हप्त्याने पैसे मिळत राहतात. म्हणजेच संबंधित प्लॉटवर घराचे बांधकाम सुरू होईपर्यंत बँक तुम्हाला एक रुपया देखील देत नाही.

परंतु बांधकाम सुरू झाल्यानंतर बँक कर्जाची मान्यता देण्यासाठी कर्मचारी पाठवतो. यासोबतच घराच्या बांधकामाचा फोटो व घराच्या बांधकामाचे अंदाजित कालावधीबाबत इंजिनीयर किंवा वास्तुविशारद प्रमाणपत्र हे बँकेत जमा करावे लागते.

तसेच तुमचे छायाचित्र पडताळण्यासाठी बँक त्यांचे तांत्रिक कर्मचारी पाठवतो आणि तपासणी झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुम्हाला मिळते.

3- कन्स्ट्रक्शन होमलोन वर आकारण्यात येणारे व्याज आणि परतफेडीचा कालावधी- साधारणपणे कन्स्ट्रक्शन होमलोनच्या बाबतीत पाहिले तर याची मुदत सामान्य होम लोन सारखीच असते. व्याजदरच्या बाबतीत उदाहरणच घ्यायची झाले

तर एलआयसी होम फायनान्स सध्या 9.10% व्याजदराने तीस वर्षाकरिता कन्स्ट्रक्शन होमलोन देत आहे त्याचप्रमाणे एचडीएफसी बँक देखील 9% प्रारंभिक व्याजदराने कन्स्ट्रक्शन होम लोन देत आहे जे 30 वर्षाच्या मुदतीसाठी असू शकते.

4- तुम्हाला किती कर्ज मिळू शकते?- कन्स्ट्रक्शन होम लोनसाठी दोन गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पहिली म्हणजे तुमच्या मालमत्तेचे मूल्य किती आहे हे महत्त्वाचे आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही ज्या जमिनीवर घर बांधणार आहात

त्या जमिनीच्या किमतीच्या 80 ते 90 टक्के रकमेपर्यंत तुम्हाला कर्ज मिळते. परंतु यामध्ये त्या कर्जाचा ईएमआय तुमच्या पगाराच्या 40 ते 45 टक्केच असावा.

बँक यापेक्षा जास्त ईएमआय स्वीकारणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे कर्ज घेताना कायम लक्षात ठेवावे लागेल की तुमचा प्रत्येक महिन्याचा ईएमआय फक्त कमाईच्या आधारावर ठरवले जाईल. तसेच तुमचा सिबिल स्कोर देखील चांगला असावा.