अरे वा! आता लग्नाचा देखील करता येईल विमा, कसे आहे या इन्शुरन्स पॉलिसीचे स्वरूप? वाचा माहिती

wedding insurance policy

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये विमा उतरवणे किंवा विमा पॉलिसी घेणे ही एक खूप मोठी आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची संकल्पना आहे. त्यामुळे व्यक्ती आता आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध पद्धतीच्या विमा पॉलिसी घेतात व ही काळाची गरज आहे.

तसेच कोरोना कालावधीपासून आरोग्य विमा उतरवण्याकडे देखील लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येते. तसे पाहायला गेले तर विम्याचे अनेक प्रकार आहेत. परंतु त्यातीलच महत्वाचा आणि एक नवीन प्रकार म्हणून जर पाहिले तर वेडिंग इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच लग्नाचा विमा देखील आता बाजारपेठेमध्ये आणला गेला आहे.

म्हणजे या पॉलिसीच्या माध्यमातून लग्न सोहळ्यासाठी एक संरक्षक कवच आपल्याला तयार करता येते.या विम्याचा जो काही प्रीमियम असतो तो तुमच्या लग्नाचा इव्हेंटचे स्वरूप कसे आहे त्यावर ठरतो.

 कसे आहे वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीचे स्वरूप?

या आधुनिक युगामध्ये आता लग्न सोहळा हा एक मोठा इव्हेंटच्या स्वरूपामध्ये साजरा करण्याकडे कल आपल्याला दिसून होतो. अगोदर साधारणपणे दोन दिवस विवाह सोहळ्याचा कार्यक्रम चालायचा. परंतु आता चार ते पाच दिवसापर्यंत लग्न सोहळा चालतो व या कालावधीमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च होत असतो.

यामध्ये हळद तसेच अनेक विविध प्रकारच्या पार्टी व इतर गोष्टींवर प्रचंड प्रमाणात खर्च होतो. परंतु काही कारणांमुळे जर लग्न रद्द झाले किंवा तारीखच पुढे ढकलावी लागली तर दोन्ही पक्षाकडील लोकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होते. या दृष्टिकोनातून लग्न सोहळ्याचा विमा करणे ही एक काळाची गरज आहे.

आता जर आपण लग्न सोहळ्यासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचा विचार केला तर ही एक असुरक्षित प्रकारची गुंतवणूक असते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केल्यानंतर जर काही कारणामुळे लग्न रद्द झाले किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी काही दुर्घटना घडली किंवा काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्याचा नक्कीच विपरीत परिणाम विवाह सोहळ्यावर होतो व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.

त्यामुळे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्याकरता अनेक विमा कंपन्यांनी आता  वेडिंग इन्शुरन्स पॉलिसी सारख्या योजना मार्केटमध्ये आणल्या असून लग्न सोहळ्यासाठी होणाऱ्या खर्चासाठी हे एक संरक्षक कवच म्हणून काम करते. या विमा पॉलिसीचा प्रीमियम हा तुमच्या लग्न सोहळ्याचे स्वरूप कसा आहे यावर ठरवला जातो.

 वेडिंग इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय काय कव्हर केले जाते?

एखाद्या कारणामुळे लग्न रद्द झाल्यास किंवा इतर कोणत्याही कारणामुळे लग्नाची तारीख पुढे ढकलली, हॉटेल आणि वाहनांची बुकिंग सह केटरिंग किंवा खाद्य विक्रेतांना दिलेले पैसे आणि घर किंवा लग्नाचे ठिकाण सजवण्यासाठी झालेला खर्च या सर्व बाबी या विम्यामध्ये कव्हर होतात. यामध्ये जे काही नुकसान होते त्याचे भरपाई ही विमा कंपनीच्या माध्यमातून दिली जाते.

या पॉलिसीमध्ये तुम्हाला ऍड ऑन आणि रायडरची सुविधा देण्यात आली असून काही दुर्दैवी प्रकार घडला तर अशा विशिष्ट परिस्थितीत रायडर्स आपल्या मदतीला येतात. परंतु या विमा पॉलिसीचे काही नियम व कायदे असून काही गोष्टी यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नाहीत.

उदाहरणच घ्यायचे झाले तर कोणत्याही जन्मजात आजारामुळे किंवा अपघात किंवा आत्महत्या मुळे मृत्यू झाल्यास हा विमा व्हॅलिड राहत नाही. तसेच दहशतवादी हल्ला किंवा अनैसर्गिक इजा झाल्यास देखील हे धोरण व्हॅलिड राहत नाही.

 कोणत्या कंपन्यांच्या माध्यमातून देऊ शकता तुम्ही वेडिंग इन्शुरन्स पॉलिसी?

तुम्हाला देखील वेडिंग पॉलिसी घ्यायची असेल तर तुम्ही बजाज अलियांस, आयसीआयसीआय लोम्बार्ड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल इन्शुरन्स सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून ही पॉलिसी घेऊ शकता.