Bank FD Vs Small Savings Schemes : प्रत्येकजण आपल्या कष्टाच्या पैशातून सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करू नये या आशेने बचत करणे सुरु करतो. मात्र, हे ध्येय गाठण्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे फार गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर तुम्हाला मोठा परतावा मिळू शकतो. अलीकडे, केंद्र सरकारने PPF, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना आणि पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट्ससह अनेक लहान बचत योजनांच्या व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
मात्र, 5 वर्षांच्या आवर्ती ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. व्याजदर 6.5 वरून 6.7 टक्के करण्यात आला आहे. त्यात 20 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या व्याजदरात बदल होण्याची शक्यता होती. पण, यावेळीही सरकारने पीपीएफ गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के इतका कायम ठेवण्यात आला त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजना आणि किसान विकास पत्र यांसारख्या योजनांवरील व्याजही स्थिर ठेवण्यात आले आहे. हे व्याजदर 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत लागू असतील.
जाणून घ्या कोणत्या योजनेत किती व्याज मिळत
अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये बचत खात्यावर 4.0 टक्के व्याज देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. गेल्या तिमाहीतही हेच व्याज दिले जात होते. ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीतही त्यात कोणताही बदल झालेला नाही.
1 वर्ष पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट – 6.9 टक्के व्याज
2 वर्षे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट – 7.0 टक्के व्याज
3 वर्षे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट – 7.0 टक्के व्याज
5 वर्षांची पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट – 7.5 टक्के व्याज
5 वर्षांची आवर्ती ठेव – 6.7 टक्के व्याज (आतापर्यंत 6.5 टक्के होते)
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र – 7.7 टक्के व्याज
किसान विकास पत्र – 7.5 टक्के व्याज (115 महिन्यांत परिपक्वतेवर)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी- 7.1 टक्के व्याज
सुकन्या समृद्धी योजना – 8.0 टक्के व्याज
मासिक उत्पन्न खाते योजना – 7.4 टक्के व्याज
ज्येष्ठ नागरिक बचत योजना – 8.2 टक्के व्याज
अधिसूचनेनुसार, लहान बचत योजनांवर 4 टक्के ते 8.2 टक्के व्याजदर आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर वार्षिक 8.2 टक्के व्याजदर आहे.
बँक एफडीवर किती व्याजदर ऑफर करते?
HDFC बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर 7.75 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे, ठेवीदाराचा कार्यकाळ आणि वयानुसार. तर ICICI वार्षिक आधारावर 7.75 टक्के व्याज देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया दरवर्षी 7.72 टक्के व्याज देत आहे.