SBI vs HDFC Bank:- गुंतवणुकीचे जे काही पर्याय उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वात जास्त पसंतीचा पर्याय म्हणून विविध बँक आणि पोस्ट खात्याच्या मुदत ठेव योजनांना प्राधान्य दिले जाते. कारण बँकांच्या मुदत ठेव योजना या गुंतवणुकीच्या दृष्टीने सुरक्षित आणि मिळणारा परतावा देखील चांगला असल्याने बरेचसे गुंतवणूकदार बँकांच्या मुदत ठेव योजनाना प्राधान्य देतात.
त्या अनुषंगाने बँकांच्या माध्यमातून देखील मुदत ठेव योजना जाहीर केल्या जातात व आकर्षक व्याजदराचा फायदा देखील गुंतवणूकदारांना दिला जातो. परंतु यामध्ये वेगवेगळ्या बँकांच्या मुदत ठेव योजनांचे व्याजदर आणि वैशिष्ट्ये वेगवेगळ्या असतात.
याकरिता कोणत्या बँकेतून किती वर्षाच्या एफडीवर किती व्याज मिळेल? हे आपल्याला एफडी करण्याअगोदर माहीत असणे गरजेचे असते व त्यामुळे दोन बँकांच्या व्याजदरामध्ये तुलना करता येते. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला जास्त व्याजदर मिळेल व अधिकचा फायदा मिळू शकतो अशा बँकांमध्ये मुदत ठेव म्हणजेच एफडी करणे फायद्याचे ठरते.
अनुषंगाने आपण स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँक पाच वर्षाच्या एफडीवर पाच लाखा करिता किती व्याज देते व किती फायदा या माध्यमातून मिळू शकतो याबद्दलची माहिती घेऊ.
स्टेट बँक ऑफ इंडियाचे एफडी दर
स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात महत्त्वाची बँक असून या बँकेच्या माध्यमातून नियमित ग्राहकांना पाच वर्षाच्या मुदत ठेव अर्थात एफडीवर वार्षिक 6.5 टक्के व्याज देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हे व्याजदर 7.50% पर्यंत आहेत. एवढेच नाही तर 27 डिसेंबर 2023 पासून दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवीवर हे व्याजदर लागू आहेत.
जर आपण स्टेट बँक ऑफ इंडियाचे एफडी कॅल्क्युलेटर पाहिले तर त्यानुसार नियमित ग्राहकाने जर पाच लाख रुपयांची एफडी केली तर त्याला मॅच्युरिटीवर एकूण सहा लाख 90 हजार दोनशे नऊ रुपये मिळतात. म्हणजे एक लाख 90 हजार दोनशे नऊ रुपये व्याजापोटी मिळत असतात.
तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जर पाच लाख रुपये पाच वर्षाकरिता जमा केले तर त्याला एकूण व्याज व मुद्दल मिळून योजना परिपक्वतेवर सात लाख 24 हजार 974 रुपये मिळतात. म्हणजे ज्येष्ठ नागरिकाला व्याजापोटी दोन लाख 24 हजार 974 रुपये मिळतात.
एचडीएफसी बँकेचे व्याजदर
एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून नियमित ग्राहकांना पाच वर्षांच्या एफडीवर सात टक्के व्याज देण्यात येत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 7.50% दराने व्याज देण्यात येत आहे. त्यानुसार जर आपण एचडीएफसी एफडी कॅल्क्युलेटरनुसार बघितले तर नियमित ग्राहकाने जर पाच लाख रुपयांची एफडी केली तर त्याला मॅच्युरिटीवर सात लाख 7 हजार 389 रुपये मिळतात.
म्हणजेच व्याजापोटी नियमित ग्राहकाला 2,07389 रुपये मिळतात. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी जर पाच लाख रुपये एफडी केले तर परिपक्वतेवर त्यांना एकूण व्याज व मुद्दल मिळवून सात लाख 24 हजार 974 रुपये मिळतात. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना व्याजापोटी 2 लाख 24 हजार 974 रुपये मिळतात.
कोणत्या बँकेत मिळतो कर कपातीचा लाभ?
जर तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये पाच वर्षाची एफडी केली तर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळतो. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त एक लाख 50 हजार रुपये पर्यंतच्या गुंतवणुकीवर कर कपातीचा दावा करता येऊ शकतो.