Success Story:- कृषी क्षेत्रामध्ये आता आधुनिकतेची वारे वाहायला लागले असून उच्च प्रकारचे तंत्रज्ञान आणि अनेक नवनवीन पिकांच्या संशोधनातून शेती क्षेत्रात झपाट्याने विकसित होत आहे.
तसेच शेतकऱ्यांनी देखील आता शेतीच्या सर्व परंपरागत पद्धती व पिकांना तिलांजली देत वेगवेगळ्या प्रकारच्या फळ पिके व भाजीपाला पिकांसारख्या पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली असल्यामुळे शेती आर्थिक दृष्ट्या शेतकऱ्यांना परवडताना दिसून येत आहे. बाजारपेठेतील मागणी व त्या अनुषंगाने घेतलेले उत्पादन यांचा ताळमेळ बसल्याने शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखोत उत्पन्न मिळवत आहेत.
आज-काल शेतकरी मोठ्या प्रमाणावर फळ पिकांची लागवड करत असून यामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या फळबागांच्या लागवडीतून लाखो रुपयांचे कमाई मिळवताना शेतकरी आपल्यालाच दिसून येत आहे.
या मुद्द्याला धरून जर आपण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापुर येथील फिरोज खान पठाण या शेतकऱ्याचा विचार केला तर पठाण यांनी अन्य शेतकऱ्यांकडे आदर्श ठेवला
असून फळबाग लागवडीमध्ये इतर पिकांपेक्षा त्यांनी काश्मिरी बोराची लागवड करण्याला प्राधान्य दिले व लागवडच नाही तर या माध्यमातून लाखोत उत्पन्न मिळवण्याची किमया देखील त्यांनी साध्य केली आहे. याचा अनुषंगाने या लेखात आपण पठाण यांच्या शेतीची माहिती घेणार आहोत.
काश्मिरी बोर लागवडीतून लाखोत उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदेड जिल्ह्यात असलेल्या अर्धापूर तालुक्यातील चेनापुर या गावचे फिरोज खान पठाण यांच्याकडे तीन एकर शेती आहे व या तीन एकर शेतीमध्ये पारंपारिक पिकांना फाटा देत त्यांनी काश्मिरी बोरांची लागवड केली.
या काश्मिरी बोरांची लागवड करण्यासाठी त्यांनी जालना येथून काश्मिरी बोराचे रोपांची खरेदी केली व तीन बाय तीन अंतरावर लागवड केली. या पिकाचे योग्य व्यवस्थापन ठेवून त्यांनी चांगले उत्पादन मिळवलेले आहे.
जर आपण काही बोर या फळ पिकाचा विचार केला तर हे माळरान व कमीत कमी पाण्यात देखील येणारे पीक असून पठाण यांनी या बोराची शेती यशस्वी केली आहे.या तीन एकर काश्मिरी बोरांचे शेतीचा खर्च त्यांना 70 हजार रुपयांचा आला परंतु हा खर्च वजा करता पठाण यांना सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.
पारंपारिक शेतीसोबत जर शेतकऱ्यांनी असे वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग केले तर शेती आर्थिक दृष्ट्या कसे परवडू शकते हे आपल्याला पठाण यांनी केलेल्या काश्मीर बोराच्या लागवडीच्या प्रयोगातून दिसून येते. फक्त यामध्ये शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास करून जर नियोजन केले तर यश नक्कीच मिळते हे पठाण यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.